पोस्टाच्या योजना प्रसारासाठी अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर
कराड डाक विभागाचा अभिनव उपक्रम

कराड/प्रतिनिधी : –
डाक विभागाच्या विविध योजनांचा प्रसार आणि ‘फिट इंडिया’चा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कराड डाक विभागाने रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी एक अभिनव उपक्रम राबवत शहरात सायकल रॅलीचे आयोजन केले. सकाळी ९ ते १० या वेळेत ही रॅली ‘Sunday On Cycle’ या देशव्यापी मोहिमेच्या अनुषंगाने पार पडली.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत ‘फिट इंडिया सायकलिंग मोहीम’ १७ डिसेंबर २०२४ रोजी नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आली होती. या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणजे ‘Sunday On Cycle’ ही सायकल चळवळ, जी देशभर राबवली जात आहे. याचाच एक भाग म्हणून कराड डाक विभागाने ही रॅली आयोजित केली.
या रॅलीस कराड डाक विभागाच्या अधीक्षिका स्वाती दळवी, डाक अधिकारी अमृत कुमटकर आणि अमित देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. कराड शहरात पार पडलेल्या या सायकल रॅलीमध्ये कराड आणि परिसरातील सर्व पोस्टमन, अधिकारी व कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
रॅलीदरम्यान सहभागी पोस्टमन व कर्मचाऱ्यांनी डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत योजनांचा प्रचार-प्रसार केला. यासोबतच सायकलिंगच्या माध्यमातून फिटनेसविषयी जागृती घडवण्याचा उद्देशही यामागे होता.
या उपक्रमात कराड प्रधान डाकघराचे पोस्टमास्तर रामलिंग राजमाने, हनुमंत वेदपाठक, शंकर सुतार, किशोर तुपे यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. संपूर्ण उपक्रमात डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकात्मिक सहभाग दर्शवत सामाजिक जबाबदारीचे भान जपले.