महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन – प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे
१ ते ७ ऑगस्टदरम्यान कराड तालुक्यात महसूल विभागाचे विशेष अभियान

कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार १ ऑगस्ट २०२५ रोजी ‘महसूल दिन’ साजरा करण्यात येणार असून, १ ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘महसूल सप्ताह 2025’ अंतर्गत कराड तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महसूल विभागामार्फत नागरिकांना शासकीय योजना, सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी जनहितार्थ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आले असल्याची माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.
येथील प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी तहसील कार्यालय कराड व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या या सप्ताहात तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
तसेच या अभियानाचे उद्घाटन १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता कराड प्रशासकीय कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यानंतर संपूर्ण आठवड्यात प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळे विषय व उपक्रम निश्चित करण्यात आले असल्याचे सांगितले.
यामध्ये दैनिक कार्यक्रमांत शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी सत्कार, गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव, विविध प्रमाणपत्रांचे वितरण. शनिवारी २ रोजी २०११ नंतरच्या अतिक्रमण प्रकरणांचे निपटारा करण्यात येणार आहे. यात सकाळी १०.३० वा. ओंड, ता. कराड येथील अतिक्रमित जागेवर लाभार्थ्यांना पट्टे वाटप, तसेच घोनाशी येथे गावठाण प्लॉट जागेची तहसीलदार, गट विकास अधिकारी, उपभूमी अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या उपस्थितीत स्थळपाहणी करण्यात करून महसूल जमिनींच्या समस्यांचे समाधान करण्यात येणार आहे.
रविवारी ३ रोजी पाणंद रस्त्यांची मोहीम राबवण्यात येणार असून नोंदणी व मोजणी करून बेकायदेशीर अडथळे दूर करून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच माजी सैनिकांच्या प्रश्नांवर बैठक होणार आहे. सोमवारी ४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत कोपर्डे हवेली येथे आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत जनता दरबारात जनतेच्या तक्रारींचे निराकरण व विविध दाखले वाटप, त्याचबरोबर तालुक्यातील १४ मंडलांमध्ये स. १० वा. दाखले वाटप करण्यात येणार आहेत. मंगळवारी ५ रोजी विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचे वाटप, बीटी कार्डचे वितरण व घरभेटी देऊन अनुदान वाटप करण्यात येणार आहे.
बुधवारी ६ रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविणे, संबंधित प्रकरणांवर कार्यवाही करणे, तर गुरुवारी ७ रोजी M-Sand धोरण अंमलबजावणी, नवीन मानकांच्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्वे अंमलबजावणी आणि सप्ताहाचा समारोप कार्यात येणार आहे.