सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार – डॉ. शिर्के

कराड/प्रतिनिधी : –
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दर्जेदार वाणांचे मार्गदर्शन व उपलब्धता करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेले सैदापूर (ता. कराड) येथील बिजोत्पादन प्रक्षेत्र हे शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरेल, असा विश्वास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे संशोधन संचालक डॉ. व्ही.एस. शिर्के यांनी व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण शासकीय कृषी महाविद्यालय, कराड व महाराष्ट्र शासनाच्या तालुका वीजगुणन केंद्र, सैदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १० हेक्टर क्षेत्रावर बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये ३.२ हेक्टरवर ऊसाच्या को-८६०३२ या विक्रमी वाणाचे व २.५ हेक्टरवर सोयाबीनच्या फुले दुर्वा या जातीचे वाणोत्पादन सुरू आहे.
डॉ. शिर्के यांनी गुरुवारी २४ सैदापूर प्रक्षेत्राला भेट देऊन चालू असलेल्या वाण संशोधन कार्याचा आढावा घेतला. यावेळी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. इंदिरा घोनमोडे यांनी प्रक्षेत्राची माहिती देताना “आगामी काळात हरभरा, माठ, सोयाबीन इत्यादी पिकांच्या वाणांचेही बिजोत्पादन करण्यात येणार असून, शेतकऱ्यांसाठी सैदापूर येथे वाण विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहे.” असे सांगितले.
या दौर्यात डॉ. शिर्के यांनी कृषि संशोधन केंद्र, कराड येथे मुरगळ, चवळी, राजमा, सोयाबीन, भात, ज्वारी अशा विविध पिकांवरील चाचणी प्रयोगांची पाहणी केली. त्याचबरोबर कृषि मनोधन केंद्रात ऊस व सोयाबीन प्रक्षेत्रालाही भेट दिली. वनस्पतीशास्त्र विषयाचा अनुभवाधारित शिक्षण घेत असलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधून त्यांना सोयाबीन व भुईमूग बिजोत्पादनाबाबत मार्गदर्शन केले.
या दौऱ्यात डॉ. शिर्कें, समवेत डॉ. सुनील कराड (कोल्हापूर), डॉ. राणी निंवाळकर (कराड), डॉ. प्रशांत पवार (सैदापूर), डॉ. तेजस कणसे, डॉ. किरण वर्णेकर, तसेच महाविद्यालय व संशोधन केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.