सातारा जिल्हाहोम

अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमाचे उद्घाटन

कराड/प्रतिनिधी : –

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड आणि ‘किकहील फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमाचा प्रभावी शुभारंभ नुकताच करण्यात आला. डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता, विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत सखोल जागरूकता निर्माण करणे आणि समाजात जनजागृती घडवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमाअंतर्गत ‘सायबर शक्ती’ नावाचा विद्यार्थी क्लब स्थापन करण्यात आला असून, प्रतीक गुंजाळकर यांची अध्यक्ष, अनुराग वाझरकर यांची सचिव, प्राजक्ता पवार यांची गतिविधी संचालक, तर वैष्णवी निकम यांची मीडिया संचालक म्हणून निवड करण्यात आली. तसेच सायबर सुरक्षिततेसाठी विशेष प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालयातून १६ ‘सायबर वॉरियर्स’ची निवड करण्यात आली आहे.

२२ जुलै रोजी महाविद्यालयात किकहील फाउंडेशनचे प्रतिनिधी दिपूसिंग यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी ‘सायबर सेफ जीसीईके – कॅम्पस घोषणापत्र’, ‘सायबर बडी जीसीईके चॅटबॉट’ आणि ‘सायबर सुरक्षिततेची प्रतिज्ञा’ या तीन अभिनव उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. ‘सायबर सेफ जीसीईके – कॅम्पस घोषणा’ करत महाविद्यालयाला अधिकृतपणे सायबर सेफ कॅम्पस घोषित करण्यात आले.

‘२४९७ सायबर बड्डी – विचारा, शिका, सुरक्षित रहा’ या घोषवाक्याखाली आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित चॅटबॉटची निर्मिती करण्यात आली आहे. हा चॅटबॉट सायबर फसवणूक, ऑनलाईन फ्रॉड, सायबरबुलिंग यांसारख्या समस्यांवर त्वरीत मार्गदर्शन करेल. याचा प्रचार QR कोड्स, पोस्टर्स आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून केला जाणार आहे. उद्घाटनप्रसंगी या चॅटबॉटवर आधारित एक लघुपट देखील दाखवण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षिततेची प्रतिज्ञा घेण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. वाघ यांच्या हस्ते प्रतिज्ञेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयात एक कायमस्वरूपी प्रतिज्ञाफलकही उभारण्यात आला आहे. दरवेळी होणाऱ्या जनजागृती सत्रानंतर विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा घेतली जाणार असून, ती शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहोचवून व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

कार्यक्रमास नियामक मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर भालसिंग यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रियंका शिंदे यांनी समन्वयक म्हणून विशेष भूमिका बजावली. यावेळी प्रा.डॉ.एस.के. पाटील, प्रा.यू.एल. देशपांडे, प्रा.के.एन. अळसुंदकर, प्रा.बी.एस. पाटील, प्राध्यापक, विद्यार्थी व सायबर वॉरियर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. वाघ म्हणाले, “सायबर सुरक्षिततेच्या क्षेत्रात साक्षरता आणि सजगतेची अत्यंत गरज आहे. ‘सायबर शक्ती क्लब’ हा विद्यार्थ्यांसाठी केवळ एक मंच नसून, समाजासाठी सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरेल.” या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालय सायबर सजगतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकत असून, भविष्यातील जबाबदार डिजिटल नागरिक घडवण्याचा संकल्प त्यामधून दिसून येतो. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles