कराड पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १५ कोटींचा निधी मंजूर
आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश; बांधकाम लवकरच होणार सुरुवात

कराड/प्रतिनिधी : –
कराड तालुका पंचायत समितीच्या कार्यालयाची नवी सुसज्ज प्रशासकीय इमारत साकारण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भाजपा-महायुती सरकारने कराड पंचायत समितीच्या स्वतंत्र आणि सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ग्रामीण विकास विभागाच्या आदेशानुसार हा निधी मंजूर करण्यात आला असून, ३६२० चौ. मी. क्षेत्रफळाच्या जागेत या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.
कराड पंचायत समितीची सध्याची प्रशासकीय इमारत ही जुनी व जीर्ण झाली आहे. यामुळे कामकाजासाठी आवश्यक जागा अपुरी पडत आहे. याच इमारतीमध्ये बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे, बाल विकास प्रकल्प आदी विभागांची कार्यालये कार्यरत आहेत. कराड तालुका हा लोकसंख्येच्या आणि कामकाजाच्या दृष्टीने मोठा तालुका असून, शासकीय कामांसाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकं येतात. पण अपुऱ्या जागेमुळे लोकांची मोठी गैरसोय होताना दिसून येत होती. अशावेळी पंचायत समितीशी निगडित सर्व कार्यालये एकाच ठिकाणी यावीत आणि त्या माध्यमातून नागरिकांना सुलभपणे सर्व शासकीय सेवांचा लाभ घेता यावा, यासाठी कराड पंचायत समितीची नवी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी करण्याचा संकल्प कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर आ.डॉ. भोसले यांनी नव्या इमारतीच्या उभारणीसाठी काही महिन्यांपूर्वी कराड येथील श्री दैत्यनिवारणी देवी मंदिराशेजारील जागेची पाहणी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत करुन, नव्या इमारतीचा आराखडा तयार केला. शिवाय मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांना हा आराखडा सादर करुन, निधी मंजुरीसाठी प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी लावून धरली होती.
आ.डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे या नव्या सुसज्ज इमारतीच्या उभारणीसाठी १५ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सरकारच्या मंजुरीमुळे लवकरच या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू होणार असून, याठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी सर्वप्रकारच्या सुविधा उभारण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने संबंधितांना दिले आहेत. या इमारतीच्या उभारणीमुळे कराडच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे. या निधीबद्दल कराडवासीयांमधून भाजपा-महायुती सरकार, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे आणि आ.डॉ. अतुल भोसले यांचे अभिनंदन केले जात आहे.
अशी असेल इमारत..
कराड पंचायत समितीची नवी भव्य व सुसज्ज इमारत उभारताना, त्याठिकाणी नैसर्गिक प्रकाश, पाण्याचा योग्य वापर आणि हरित इमारतीसाठी आवश्यक तांत्रिक बाबींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच महिलांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृह व प्रसाधनगृहाची तरतूद आणि अपंगांसाठी रॅम्प, रेलिंग यासारख्या सुविधादेखील उभारण्यात येणार आहेत.
कराड पंचायत समितीची नवी प्रशासकीय इमारत सुसज्ज, कार्यक्षम आणि सर्वसमावेशक केंद्र ठरणार आहे. पंचायत समितीचे कामकाज अधिक गतिमान होऊन, नागरिकांना उत्तम सेवा मिळू शकतील. कराड परिसराच्या प्रशासकीय विकासासाठी ही मोठी पाऊलवाट ठरेल, तसेच या इमारतीमुळे कराडच्या सौंदर्यात भर पडेल.
– आ.डॉ. अतुलबाबा भोसले