सातारा जिल्हाहोम

कराड उड्डाणपुलाचे काम धीम्या गतीने 

१११ अपघातांत ५० मृत्यू; आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचा विधानसभेत ठेकेदार कंपनीवर गंभीर आरोप

कराड/प्रतिनिधी : – 
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील सहापदरीकरण आणि कराड शहरालगत उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, या दिरंगाईमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीसह अपघातांची मालिका घडत आहे. गेल्या चार वर्षांत या मार्गावर १११ अपघात झाले असून, त्यात ५० नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या सर्व परिस्थितीला संबंधित ठेकेदार कंपनी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार डॉ. अतुल भोसले यांनी राज्य विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडताना केला.
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या विषयावर लक्षवेधी सूचना मांडून आ. डॉ. भोसले यांनी महामार्ग व उड्डाणपूल कामातील दिरंगाईमुळे होणाऱ्या अपघातांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, “पूर्वी साताऱ्याहून कोल्हापूरपर्यंतचा प्रवास दीड-दोन तासांत पूर्ण होत असे. मात्र, सध्या सहापदरीकरणाच्या रखडलेल्या कामामुळे तो प्रवास तब्बल साडेतीन ते चार तासांचा झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अपूर्ण आहेत, सर्व्हिस रोड तयार नाहीत आणि उड्डाणपूल अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे.”
यावेळी त्यांनी कराड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अपघातांची आकडेवारी सभागृहात सादर केली. २०२१ ते २०२५ या कालावधीत एकूण १११ अपघात झाले असून, त्यात ५० नागरिकांचा बळी गेला आहे. कामगारांचे पगार वेळेवर न दिल्याने काम अनेक वेळा बंद ठेवले गेले. ठेकेदार कंपनीला दोन वेळा मुदतवाढ देऊनही काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे पुढे कोणतीही एक्स्टेन्शन न देता कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही आ. भोसले यांनी केली.
या सूचनेला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी, कराड येथील उड्डाणपुलाचे काम ऑक्टोबर २०२५ पर्यंत आणि कागल ते शेंद्रे महामार्गाचे सहापदरीकरण एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित ठेकेदार कंपनीला दिल्याचे सभागृहात सांगितले. महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक सर्व सुरक्षाविषयक उपाय तत्काळ करण्याचेही आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Related Articles