कृष्णा कारखान्यास सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
भारतीय शुगरकडून सन्मान; कोल्हापुरात शुक्रवारी होणार वितरण

कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने नेहमीच नवनवीन प्रयोग करत, शेतकरी सभासदांचे हित साधले आहे. साखर उत्पादनासोबतच कारखान्याच्या माध्यमातून उपपदार्थ निर्मितीवर भर दिला आहे. कारखान्यात उच्च प्रतीचे इथेनॉल, देशी मद्य, रेक्टीफाईड स्पिरिट इत्यादींचे उत्पादन घेतले जाते.
कृष्णा कारखान्याच्या डिस्टीलरीमध्ये सर्वोच्च फर्मन्टेशन आणि डिस्टलेशन कार्यक्षमतेसह १२८ % प्रकल्प क्षमतेचा वापर केला आहे. तसेच निर्धारित वेळेत ऑईल कंपन्यांना संपूर्ण इथेनॉल प्रमाणाचा पुरवठा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्याचबरोबर सर्व नियामक आणि ग्राहक मानकांची पूर्तता करून, रेक्टिफाइड स्पिरिटची उच्च गुणवत्ता सातत्याने राखली आहे. या सर्व कार्याची नोंद घेत संस्थेने हा पुरस्कार कृष्णा कारखान्याला जाहीर केला आहे.
भारतीय शुगरच्यावतीने कोल्हापूर येथे शुक्रवार दि. १८ जुलै २०२५ रोजी आयोजित साखर परिषदेच्या वार्षिक पारितोषिक सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत कृष्णा कारखान्यास सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी दिली.
चौकट
‘कृष्णा’ची राष्ट्रीय पुरस्कारांची हॅट्ट्रिक
गतवर्षी भारतीय शुगरकडून कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट कारखाना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याच महिन्यात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्यावतीने नवी दिल्ली येथे कारखान्याला नुकताच उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर आता भारतीय शुगरकडून सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामुळे कृष्णा कारखान्याने दोन वर्षात सलग तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळविण्याची हॅट्रीक साधली आहे.