शतकोत्तर शैक्षणिक संस्था उभारून त्या कार्याचे सातत्याने संवर्धन, हीच खरी आदर्श परंपरा – डॉ. सुरेश भोसले
शिक्षण मंडळ, कराडचा गुरुगौरव समारंभ उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
“संस्थापकांनी रुजवलेल्या शिक्षणविषयक मूल्यांच्या पायावर शतकोत्तर शैक्षणिक संस्था उभारून त्या कार्याचे सातत्याने संवर्धन करणं, हीच खरी आदर्श परंपरा आहे. शिक्षण मंडळ, कराड हे काम अत्यंत कौतुकास्पद रीतीने करत आहे,” असे गौरवोद्गार कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी काढले.
शिक्षण मंडळ, कराडतर्फे आयोजित गुरुगौरव समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षक, शिक्षिका, सेवक, विद्यार्थी आणि कलाकारांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. सुरेश भोसले यांनी शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीचे आणि कराड शहराच्या शैक्षणिक वाटचालीचे विशेष कौतुक केले.
डॉ. भोसले म्हणाले, “पुण्यानंतर ग्रामीण भागासाठी कराड शहर हे शिक्षणाचे केंद्र बनले आहे. 1920 नंतर शिक्षण मंडळ कराडच्या माध्यमातून आणि यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बापूजी साळुंखे यांसारख्या द्रष्ट्या नेत्यांच्या पुढाकाराने शैक्षणिक महाविद्यालयांची मुहूर्तमेढ रचली गेली. त्यामुळे कराड परिसरात औषधनिर्माण, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, विज्ञान व वैद्यकीय शिक्षणाच्या विविध संकुलांची उभारणी झाली.”
ते पुढे म्हणाले, “जयवंतराव भोसले यांच्या संकल्पनेतून कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय व कृष्णा हॉस्पिटलची स्थापना झाली. आज शिक्षणक्षेत्र अनेक आव्हानांपुढे उभे आहे. नवी पिढी आणि बदलती तंत्रज्ञानाधिष्ठित प्रणाली यांचा विचार करून शैक्षणिक धोरणे आखणे गरजेचे आहे. शिक्षण मंडळ कराडने विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करून या दिशेने चांगले पावले उचलली आहेत.” “नालंदा विद्यापीठ ही आपल्या प्राचीन ज्ञान परंपरेची जगासमोर साक्ष आहे. त्या परंपरेचा वारसा जपत आधुनिक शिक्षण पद्धतींचा योग्य समन्वय आजच्या शिक्षण संस्थांनी साधावा, असेही त्यांनी सांगितले.
या समारंभात डॉ. सुरेश भोसले यांना कै. डॉ. रा. गो. प्रभुणे यांच्या सौजन्याने देण्यात येणारा डॉ. रा. भा. देवस्थळी स्मृती शैक्षणिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल हुद्देदार होते. यावेळी चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. मोहन राजमाने, डॉ. सतीश भिसे व डॉ. अनिल हुद्देदार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी यांनी स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी, परिचय व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सूत्रसंचालन आदिती जोशी व सुचेता पाटील, सहसचिव राजेंद्र लाटकर यांनी आभार मानले.
विविध पुरस्कारप्राप्त मान्यवर
डॉ. भोसले यांच्या हस्ते खालील मान्यवरांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये विद्यारत्न पुरस्कार : रयत शिक्षण संस्था, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय (स्वायत्त), कराड, साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार – प्रमोद संकपाळ (कै. क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृह), आदर्श शिक्षिका पुरस्कार – डॉ. स्नेहल मकरंद राजहंस (कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक), आदर्श निवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार – सुषमा इंदुलकर (पी.के. सावंत विद्यालय, अडरे – चिपळूण), आदर्श प्राचार्य पुरस्कार – डॉ. सतीश भिसे (निवृत्त प्राचार्य, औषधनिर्माण महाविद्यालय, कराड), उत्कृष्ट नाट्यकर्मी पुरस्कार – प्रकाश पागनीस (प्रवचनकार व रंगकर्मी, पुणे), उत्तम शिक्षक पुरस्कार – उदय कुंभार (टिळक हायस्कूल, कराड), प्राथमिक विभागातील उत्तम शिक्षक पुरस्कार – ज्योती ननवरे (टिळक हायस्कूल, कराड), उत्तम सेवक पुरस्कार – शारदा चव्हाण (इंग्रजी माध्यम शाळा, कराड), आदर्श विद्यार्थी पुरस्कार – सानिका रामचंद्र गरूड (टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कराड), सेवाव्रती पुरस्कार – अशोक रंगराव पवार (निवृत्त अभियंता, कराड नगरपरिषद), विज्ञान शिक्षक पुरस्कार – जीवन थोरात (टिळक हायस्कूल, कराड) यांना सन्मानित करण्यात आले.