भाजपा राज्य परिषदेवर संजय पवार व हर्षवर्धन मोहिते यांची निवड

कराड/प्रतिनिधी : –
भारतीय जनता पक्षाच्या राज्य परिषद सदस्यपदी कराड दक्षिणमधून माजी पंचायत समिती सदस्य संजय पवार आणि भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी या नावांची घोषणा केली असून, या निवडीनंतर कराड दक्षिणमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील संजय पवार हे १९८७ पासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते सामाजिक संस्थांपर्यंत अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत. यापूर्वी ते पंचायत समितीचे सदस्य राहिले असून, संजय गांधी निराधार योजनेचे कराड तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी गरजू वंचितांसाठी कार्य केले आहे. सध्या ते शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तसेच सहकार भारतीच्या दुग्ध प्रकोष्ठचे राज्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील सहकारी चळवळ आणि दुग्ध व्यवसायाला चालना देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
तसेच हर्षवर्धन मोहिते हे कृष्णा सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यांनी यापूर्वी भाजपाचे कराड तालुकाध्यक्ष आणि सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. नव्याने नियुक्त झालेले राज्य परिषद सदस्य संजय पवार आणि हर्षवर्धन मोहिते हे कराड दक्षिणचे आमदार आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जातात.
पक्षाच्या राज्य परिषदेसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून दोघांची निवड केली जाते. या समितीत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अशा दिग्गजांचा समावेश असून, एकूण ४५४ जणांचा या यादीत समावेश आहे.
या निवडीबद्दल आमदार डॉ. भोसले यांनी दोघांचेही अभिनंदन केले असून, संजय पवार व हर्षवर्धन मोहिते यांची राज्य परिषदेवर झालेली निवड हा संपूर्ण कराड दक्षिणमधील कार्यकर्त्यांच्या कार्याला दिलेला सन्मान असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनीही पुष्पगुच्छ देऊन या दोघांचा सत्कार केला.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक वसीम मुल्ला, डॉ. सुशील सावंत, विक्रम साळुंखे यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.