कराड तालुक्यात संभाव्य पूरस्थितीबाबत प्रशासन सतर्क – प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे

कराड/प्रतिनिधी : –
तालुक्यात संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने सज्जता दर्शवली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत सर्व कार्यालय प्रमुखांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी तालुक्यात संभाव्य पूरस्थितीवर प्रशासन सतर्क असून सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवार, दि. ७ जुलै रोजी जिल्ह्याच्या पूरस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानुसार तालुकास्तरीय प्रशासनाला आवश्यक तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सर्व विभागांना संभाव्य पूरस्थितीत योग्य समन्वय साधून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणतीही जिवीतहानी, वित्तहानी किंवा पशुधनहानी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. हानी झाल्यास तात्काळ पंचनामे करून अहवाल महसूल विभागाकडे सादर करण्यास सांगण्यात आले. महसूल विभाग, कराड व मलकापूर नगरपालिका, पंचायत समिती आणि महावितरण यांच्यात नियमित संपर्क ठेवून एकात्मिक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
तसेच आरोग्य विभाग आणि उपजिल्हा रुग्णालयांना साथीच्या आजारांवरील उपचारासाठी, त्याचबरोबर सर्प दंशावर प्रभावी औषधांचा मुबलक साठा ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील गावांमधील ओढे-नाले स्वच्छ करून रस्त्यांवर पाणी साचू नये, याची दक्षता घेण्यासही संबंधित विभागांना सूचित करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे काटेकोर पालन करून संभाव्य संकटाचा सामना करण्याची तयारी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ग्रामपातळीवर जनजागृतीसाठी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना बैठका घेण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच पूरस्थितीत स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांसाठी शाळांमध्ये वीज, पाणी व स्वच्छतागृहाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. आपत्तीच्या काळात नागरिकांनी घाबरून न जाता तालुका प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी ०२१६४–२२२२१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. या बैठकीस कराड तालुक्यातील सर्व विभागांचे कार्यालय प्रमुख, नदी पात्रालगतच्या गावांतील ग्राम महसूल व ग्रामविकास अधिकारी, तसेच सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते.