विजयनगर येथे स्व. प्रेमलाकाकी चव्हाण व स्व. आनंदराव चव्हाण यांचा स्मुर्तीदिन साजरा

कराड/प्रतिनिधी : –
विजयनगर, ता. कराड येथील प्रेमलाकाकी माध्यमिक विद्यालयात स्व. प्रेमलाकाकी चव्हाण (काकी), स्व. आनंदराव चव्हाण (काका) आणि स्व. रामचंद्र राघोजी पाटील (दादा) यांचा स्मुर्तीदिवस साजरा करण्यात आला. आदरणीय स्व. प्रेमलाकाकी चव्हाण, स्व. आनंदराव चव्हाण आणि स्व. रामचंद्र पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले.
यावेळी विधानपरिषदेचे माजी आमदार आनंदराव पाटील (नाना), कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड. सुरेशराव कुराडे, मलकापूर रोटरी क्लबचे डायरेक्टर सलीम मुजावर, उद्योजक आर. टी. स्वामी, मुंढे गावचे माजी सरपंच आनंदराव जमाले, उपसरपंच रमेश लवटे, विजयनगरचे माजी उपसरपंच विश्वासराव पाटील, माजी सरपंच संजय शिलवंत, दिलीपराव पाटील, विजराव कदम, डी. डी. यादव, बबन शिर्के, नागेंद्र कोरे, काशिनाथ जाधव, प्रल्हाद संकपाळ, नवनाथ यादव, शिवाजीराव जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक चव्हाण, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी, तसेच विजयनगर, मुंढे, पाडळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार आनंदराव पाटील म्हणाले, माझ्या राजकीय जीवनामध्ये आदरणीय स्व. प्रेमलाकाकी चव्हाण (काकी) यांचा मोलाचा वाटा आहे. स्व. प्रेमलाकाकी यांनी मला दिलेला राजकीय आधार व खंबीर साथ मी शेवटच्या श्वासापर्यंत विसरु शकत नाही. काकींनी आपल्या पुनर्वसित गावासाठी खूप मदत केली. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचा व सुसंस्कृतपणा जपण्याचा मी आजही काटेकोरपणे प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी देखील आपल्या शालेय जीवनामध्ये अशा महान व्यक्तिमत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण घेतले पाहिजे व त्यांचे विचार अंगीकृत केले पाहिजेत.
अॅड. सुरेश कुराडे यांनी विद्यार्थ्यांना स्व. प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या काळातील काही आठवणी सांगितल्या. काकी नानांच्या पाठीशी खंबीर पण उभ्या राहिल्या. त्यांनी कधीही कार्यकर्त्यांमध्ये अंतर पडू दिले नाही. विद्यार्थ्यांना भावी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी गावचे नाव मोठे करण्यासाठी कायम प्रयत्न करत राहिले पाहिजे. वक्तृत्व, कला, क्रीडा आदी स्पर्धांच्या माध्यमातून शाळेचे नाव उच्च स्थराला न्यायला हवे. आज आम्ही कोणत्या परिस्थितीमधून इथंपर्यंत पोहचू शकलो, त्यासाठी आम्ही किती अडचणींना सामोरे गेलो व यशस्वी झालो, याबद्धल मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
सलीम मुजावर व उद्योजक आर. टी. स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यालयातील वक्तृत्व, चित्रकला, वेशभूषा, विविध स्पर्धांमध्ये क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. सलीम मुजावर यांनी शाळेला स्वच्छ पाणी मिळणेसाठी नवीन फिल्टर टाकी देण्याची घोषणा केली. मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर यांनी आभार मानले.