अनुदानित शाळांच्या समस्यांबाबत शिक्षण संस्थांचा शुक्रवारी साताऱ्यात महामोर्चा

कराड/प्रतिनिधी : –
राज्यातील अनुदानित शाळांवरील वाढत्या संकटांमुळे संतप्त झालेल्या शिक्षण संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुक्रवार (दि. 11) जुलै 2025 रोजी साताऱ्यात गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर भव्य महामोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तसेच या दिवशी जिल्ह्यातील बहुतांश शाळा बंद ठेवण्यात येणार असून शिक्षक, कर्मचारी आणि निवडक पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या पत्रकात म्हटले आहे की, “राज्यातील मराठी माध्यमातील व अन्य अनुदानित शाळांची स्थिती अतिशय दयनीय बनली असून, शासनाच्या धोरणांमुळे या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिक्षण क्षेत्र वाचवण्यासाठी एकत्रित संघर्षाची ही वेळ आहे.” त्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे.
यामध्ये अनुदानित शाळांच्या समस्या शासन स्तरावर तातडीने सोडवाव्यात, 15 मार्च 2024 चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करून 28 ऑगस्ट 2015 च्या निर्णयानुसार कार्यवाही करावी,
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीला तात्काळ मान्यता द्यावी, शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल रद्द करावे आणि वर्षांतून किमान दोनवेळा भरती प्रक्रिया राबवावी, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगानुसार अनुदान मिळावे,
टप्पा वाढ व इतर शैक्षणिक मागण्या त्वरीत मान्य कराव्यात आदी मागण्या करण्यात येणार आहेत.
मोर्चासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांचे व्यवस्थापन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सज्ज झाले असून गांधी मैदान, राजवाडा येथे सकाळी 10 वाजता एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. मोर्चादिवशी अनेक शिक्षण संस्था आपापल्या शाळा बंद ठेवणार असून, संबंधित मुख्याध्यापकांना त्याबाबत लेखी आदेश देण्याची सूचना संस्थाचालकांना देण्यात आली आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक प्रतिनिधींनी या आंदोलनात सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहनही सदर पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.