सातारा जिल्हाहोम

डॉ. प्रकाश आमटे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

कराड/प्रतिनिधि : –

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (कराड) यांचा २०२५ चा जीवनगौरव पुरस्कार ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते, रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त, पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे, नवनियुक्त अध्यक्ष राम दाभाडे, प्रमोद तोडकर, सचिव हरिभाऊ बल्लाळ, कार्याध्यक्ष राहुल वायदंडे, उपाध्यक्ष कृष्णत तुपे, सुरज घोलप, रमेश सातपुते, ॲड. विशाल देशपांडे, रमेश सातपुते, गजानन सकट, संजय तडाखे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, डॉ. प्रकाश आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्य़ातील आदिवासी लोकांसाठी ‘लोक बिरादरी’ प्रकल्प उभारला असून त्यामाध्यमातून आदिवासींसाठी दवाखाना, शाळा आणि वन्यजीव अनाथालय सुरू केले आहे. आदिवासींना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे काम केले आहे. तसेच आदिवासींमध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्याचे काम केले आहे.
डॉ. प्रकाश आमटे यांना आदिवासी सेवक पुरस्कार (महाराष्ट्र शासन), गॉड फिलीप जीवनगौरव पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार (भारत सरकार), मॅगसेसे पुरस्कार, मदर तेरेसा पुरस्कार, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती सोहळ्यामध्ये त्यांना शेतमजूर, दुष्काळ निर्मुलन चळवळ, सांस्कृतिक चळवळ व श्रमिक मुक्ती आंदोलनाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, कराड येथे शुक्रवार (दि.२२) ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या वतीने या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Related Articles