उंब्रजमधील 225 कोटींच्या पारदर्शक उड्डाणपुलाचे आ. मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत सादरीकरण

कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी असलेल्या उंब्रज (ता. कराड) येथे 225 कोटी रुपयांच्या पारदर्शक उड्डाणपुलाचे सादरीकरण नुकतेच पार पडले. आमदार मनोज घोरपडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसमोर मांडला.
यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी संजय कदम, महेश शितोळे, अजय घारे, तसेच उंब्रज गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. सदर उड्डाणपूल हा तारळी नदीपासून सुरू होऊन उत्तरमांड नदीपर्यंत जाणारा, एकूण १२०० मीटर लांबीचा असणार असून, वरून सहा लेन आणि खालून आठ लेन असलेला हा पूल अत्याधुनिक आणि पारदर्शक असेल, असे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार घोरपडे म्हणाले, “उंब्रजमध्ये पारदर्शक उड्डाणपूल व्हावा, ही सर्व उंब्रजवासीयांची मागणी होती. ती आता प्रत्यक्षात साकार होत आहे. यामुळे उंब्रजच्या वैभवात भर पडणार आहे.” “उंब्रजमध्ये सुसज्ज शासकीय विश्रामगृह उभे राहणार असून त्याला मंजुरी मिळाली आहे. तसेच अप्पर तहसील, सब-रजिस्ट्रार कार्यालय आणि नगरपंचायत स्थापन करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विक्रम घोरपडे, चंद्रकांत जाधव, योगीराज जाधव, दिगंबर भिसे पाटील, पवन जाधव, विजय जाधव, विनायक जाधव, गणेश सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उंब्रज व परिसरात साखर कारखान्यांमुळे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे दरवर्षी वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न उभा राहत होता. या पुलामुळे उंब्रजसह सुमारे ३५ गावांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटणार असून, नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी 225 कोटी रुपयांची निविदा लवकरच निघणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या सहकार्यामुळे यास गती मिळाली आहे. या पुलाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला.