यशवंतराव चव्हाण कॉलेजचे जागतिक स्तरावर यश
डॉ. अमोल पाटील यांना बारा पेटंट्स; प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार यांचे मार्गदर्शन मोलाचे

कराड/प्रतिनिधी : –
येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्सने संशोधनाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकले असून, महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमोल मोहन पाटील यांनी एकूण बारा पेटंट्स प्राप्त करत आंतरराष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. यामध्ये ११ भारतीय व १ जर्मन पेटंटचा समावेश आहे.
डॉ. पाटील यांनी AI व नवनवीन तंत्रज्ञान वापरून विविध संशोधन उपकरणांचा विकास केला आहे. यामध्ये प्लांट ड्रग एक्स्ट्रक्शन डिवाइस, स्मार्ट प्लांट हेल्थ मॉनिटरिंग डिवाइस, प्लांट व्हायरस डिटेक्शन डिवाइस, ग्राफीन बेस एअर फिल्ट्रेशन सिस्टम, नॅनो कॅटलिस्ट ड्रग फॉर्मुलेशन डिवाइस, सेल्फ ऍक्टिव्हेटिंग सिम्बॉयसिस बूस्टर यांसारख्या नाविन्यपूर्ण उपकरणांचा समावेश आहे.
या कामगिरीबद्दल प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार म्हणाले, “डॉ. अमोल पाटील यांनी संशोधनात सातत्य ठेवून विज्ञान क्षेत्रात अत्यंत नावीन्यपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचा शोध हा कृषी, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात उपयुक्त ठरेल.”
डॉ. पाटील यांच्या या यशस्वी वाटचालीत यशवंतराव मोहिते महाविद्यालय, पुणे येथील प्रो. डॉ. एस. जी. पवार, तसेच संस्थेचे जनरल सेक्रेटरी ए. एन. मुल्ला, सदस्य अरुण पाटील काका, प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार, व इतर मान्यवरांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. तसेच प्रो. डॉ. जी. जी. पोतदार, प्रो. डॉ. एस. ए. कीर्तने व डॉ. भरत महाडिक यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे.
डॉ. पाटील यांचे आत्तापर्यंत ११ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध व ७ पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे. ते मूळचे अंबक (चिंचणी), ता. कडेगाव येथील असून, त्यांनी आपल्या संशोधनात्मक कार्यातून महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केला आहे. शिवाजी शिक्षण संस्था, महाविद्यालय व संपूर्ण परिसरातून डॉ. अमोल पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.