सातारा जिल्हाहोम

गुटखा विक्रीत सहभागी एफडीए आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा – आमदार मनोज घोरपडे यांची विधानसभेत मागणी 

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तर मतदार संघाचे आमदार मनोज घोरपडे यांनी आज विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडून महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असून सुद्धा शेजारील राज्यांमधून पोलीस व एफडीआयचे अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात गुटखा महाराष्ट्रात विक्रीसाठी येत असून त्याचा जास्तीत जास्त फटका आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील लगतच्या जिल्ह्यांना बसत आहे. त्यामुळे या यंत्रणेत संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी विधानसभेत मागणी केली.

विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडणीच्या वेळी आमदार मनोज घोरपडे यांनी हा मुद्दा उचलला. आमदार घोरपडे म्हणाले, युवा पिढी गुटख्यामुळे बरबाद होत आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही पान टपरीवर गेलं तरी सहजपणे गुटखा उपलब्ध होतो. याला आळा बसला पाहिजे. गुटखा हा पूर्णपणे बंद झाला पाहिजे. तसेच एफडीएमध्ये अनेक पदे रिक्त असून ती लवकरात लवकर भरली जावीत. जप्त केलेले गुटखा, तसेच इतर पदार्थ तपासणीसाठी प्रयोगशाळा वाढवाव्यात. एफडीएची कारवाई करण्यासाठी पोलिसांना स्वातंत्र्य मिळावे. आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये एफडीएच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळांसाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी केली. या चर्चेमध्ये आमदार श्वेता महाले आमदार विक्रम पाचपुते यांच्यासह सात सदस्यांनी सहभाग घेतला.

लक्षवेधीचा इफेक्ट :

आमदार मनोज घोरपडे यांनी विधानभवनामध्ये मांडलेल्या लक्षवेधीमुळे संबंधित विभागाचे उपसचिव यांच्यावर मंत्री महोदयांनी तात्काळ कार्यवाही करत त्यांच्याकडे संबंधित विभागाचा असणारा चार्ज काढून घेण्यात आला.

Related Articles