सातारा जिल्हाहोम

पुरस्कारांमुळे समाजातील संस्कृती सुदृढ – डॉ. संजय पुजारी

व्यंगचित्रकार अशोक सुतार छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित ; अ. भा. स्वाभिमानी संघर्ष सेनेतर्फे गौरव

कराड/प्रतिनिधी : –

पुरस्कारांमुळे साहित्यिक, कला, क्रीडा क्षेत्रांतील व्यक्तींचा काम करणार्‍यांचा उत्साह द्विगुणित होतो. समाजातील विशेष कार्य करणार्‍या व्यक्तींना प्रोत्साहन मिळते. समाजातील विशेष व्यक्तींच्या कार्याची थोरवी समजते, त्यामुळे संस्कृती सुदृढ होते, असे प्रतिपादन डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्राचे संचालक व विज्ञान प्रसारक डॉ.संजय पुजारी यांनी अ. भा. स्वाभिमानी संघर्ष सेना, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा – २०२५ कार्यक्रमात केले.

सत्यवान मंडलिक लिखित इथे जन्मली माणुसकी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व पिराजी थोरवडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अ. भा. स्वाभिमानी संघर्ष सेना, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा – २०२५ यशवंतरावजी चव्हाण स्मृति सदन टाऊन हॉल, कराड येथे दि. १ जुलै रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संजय पुजारी बोलत होते.

यावेळी अ. भा. स्वाभिमानी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष साहित्यिक सत्यवान मंडलिक, विशेष अतिथी दैनिक प्रीतिसंगमचे उप संपादक व आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार अशोक सुतार, पत्रकार दशरथ पवार व उद्घाटक अ. भा. मराठा साहित्य परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विक्रम शिंदे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

अ. भा. स्वाभिमानी संघर्ष सेनेने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्राचे संचालक डॉ.संजय पुजारी यांच्या हस्ते दैनिक प्रीतिसंगमचे उप संपादक व आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार अशोक सुतार यांचा व्यंगचित्र क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी अशोक सुतार यांनी व्यंगचित्रकारितेतील अनेक अनुभव आपल्या मनोगतात व्यक्त केले.

सौ. अनिता चेतन घाटगे, सुहास चव्हाण, कांचन क्षीरसागर, सर्जेराव देशमुख व सौ अस्मिता देशमुख, संतोष पवार, शितलकुमार अर्धावर, संतोष पाटील, विजय चव्हाण, विश्वास निकम, संतोष डांगे, अमर जाधव, सौ. विजया माने, सौ विद्याताई मोरे, स्वाभिमानी साहित्यसेवा पुरस्कार कादंबरी: विशाल मोहोड, दिवाकर म्हात्रे, कथासंग्रह: गोकुळ गायकवाड, सौ. आरती लाटणे, शरद अत्रे, डॉ. सुनिता चव्हाण, तसेच कविता संग्रह,नाटक, आत्मचरित्र, ऐतिहासिक,वैचारिक लेख संग्रह,समिक्षा ग्रंथ,दिवाळी अंक – मुक्त संवाद पुरस्कार पुरस्कार्थी उपस्थित होते.

जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक अन्वी घाडगे हिने शिव ललकारी देत उपस्थितांचे मन जिंकून घेतले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या वेषात येऊन चित्रपट व टीव्ही कलाकार राजाराम काळे यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष डांगे यांनी केले तर आभार किरण थोरवडे यांनी मानले.

Related Articles