सातारा जिल्हाहोम

कराडच्या सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये शॉर्टसर्किटमुळे किरकोळ आग, कोणतीही जीवितहानी नाही 

सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाने दिली माहिती

कराड/प्रतिनिधी : –

सह्याद्रि हॉस्पिटल, कराड येथील एका बंदिस्त विभागात बुधवार (दि. २) जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे किरकोळ आग लागल्याची घटना घडली. ही आग हॉस्पिटलच्या दक्ष कर्मचाऱ्यांनी तत्काळ आपत्कालीन यंत्रणा राबवत नियंत्रणात आणली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या पत्रकात म्हंटले आहे की, बुधवारी संध्याकाळी अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे एका विभागात आगीचे लहानसे लोळ उठले. प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन उपकरणांचा वापर करत आग विझवण्यास सुरुवात केली. केवळ १५ मिनिटांत आग पूर्णतः नियंत्रणात आणण्यात आली. यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण विभागाची तपासणी केली. या तपासणीत आग पूर्णपणे विझवली गेली असून आत कुठेही उर्वरित धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

घटनेच्या वेळी हॉस्पिटल प्रशासनाने तत्काळ आपत्कालीन सूचना जाहीर करत लिफ्टचा वापर टाळण्याचे निर्देश सर्व रुग्ण, नातेवाईक व कर्मचाऱ्यांना दिले होते. ही सूचना शिस्तबद्धपणे पाळण्यात आली. संपूर्ण इमारतीतून रुग्ण व उपस्थित व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

या घटनेमुळे काही काळ हॉस्पिटलचे नियमित कामकाज थांबवण्यात आले होते. मात्र, आता सर्व सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची स्थिती पूर्णपणे स्थिर असून उपचार सुरळीतपणे सुरू आहेत.

“या काळात रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेले संयम व सहकार्य आमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. आम्ही त्याबद्दल मनापासून आभार मानतो. कृपया कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा त्या पसरवू नका. रुग्णांची सुरक्षितता आणि काळजी हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे.” या घटनेमुळे हॉस्पिटलमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी देखील उपस्थित राहून पुढील तपास करत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

Related Articles