सहकारी उपसा सिंचन योजनांचा ‘जलद सिंचन लाभ कार्यक्रमात’ समावेश करा – आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची विधानसभेत मागणी

कराड/प्रतिनिधी : –
राज्यात शेतकऱ्यांनी सहकार तत्वावर सुरू केलेल्या उपसा जलसिंचन योजनांना नवी उर्जा मिळवून देण्यासाठी या योजनांचा समावेश केंद्र शासनाच्या ‘जलद सिंचन लाभ कार्यक्रमात’ करावा, अशी ठाम मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आज राज्य विधानसभेत केली.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार डॉ. भोसले यांनी या विषयाला सभागृहात वाचा फोडली. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर उपसा सिंचन योजना राबवल्या आहेत. या योजनांमुळे मोठ्या प्रमाणात शेती ओलिताखाली आली असून ग्रामीण भागाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळाली आहे.”
या योजनांची उभारणी करण्यासाठी अनेक ठिकाणी सहकारी साखर कारखान्यांनी देखील पुढाकार घेतला आहे. परिणामी, शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग वाढले असून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. परंतु, सध्या या योजनांना तांत्रिक व आर्थिक अडचणींमुळे अडथळे येत आहेत. त्यामुळे शासनाने या योजनांचा समावेश केंद्र शासनाच्या ‘जलद सिंचन लाभ कार्यक्रमात’ करून त्यांना आवश्यक ती मदत द्यावी, अशी ठोस मागणी त्यांनी केली.
या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. अशा प्रकारच्या योजनांना सरकारी पाठबळ मिळाल्यास, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जलसिंचनाची क्रांती घडेल, असा विश्वास आमदार डॉ. भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.