सातारा जिल्हाहोम

ऊस उत्पादन वाढीसाठी पंचसुत्रीचा वापर करणे आवश्यक – संजीव माने

जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण व वृक्षदिंडी

कराड/प्रतिनिधी : –

जमिनीची सुपिकता, ऊस लागणीची योग्य पद्धत, रासायनिक खतांची मात्रा,  पाणी व्यवस्थापन आणि पिकसंरक्षण या पंचसुत्रीचा वापर एकरी उस उत्पादन वाढीसाठी  करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन कृषीभूषण संजीव माने यांनी केले.

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात स्व.वसंतराव नाईक जयंती व महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण, वृक्षदिंडी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक बाबासो शिंदे होते.

कार्यक्रमास संचालक बाजीराव निकम, शिवाजी पाटील, जे डी.मोरे, विलास भंडारे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, कृष्णा विश्व विद्यापीठाचे उपकुलसचिव एस.ए. माशाळकर, आंतरराष्ट्र व्यवहार विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, जयवंतराव साळुंखे, माजी पंचायत समिती सदस्य सुनील पोळ, जनरल मॅनेजर (केन) दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील आदी उपस्थित होते.

संजीव माने पुढे म्हणाले, ऊस शेतीकडे शाश्वत पिक आहे. जमिनीची सुपिकता हा ऊस शेतीमध्ये महत्त्वपूर्ण आहे. सेंद्रीय कर्ब कमी होत असतांना शेण खत, हिरवळीचे खते, गांडूळ खताचा वापर करून सेंद्रीय कर्ब वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. लागवडी पूर्वी माती परिक्षणनुसार खतांचा वापर, योग्य प्रमाणात शेण खत अथवा इतर सेंद्रीय खतांची मात्रा देत असतांना मुख्य, दुय्यम सुक्ष्म आणि सुक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा. जास्त रासायनिक खते जास्त उत्पादन हा लोकांचा गैरसमज आहे. शास्त्रोक्त पद्धतीने ऊस शेती केल्यास एकरी १०० ते १२५ टन ऊस उत्पादन सहज शक्य असल्याचे कृषिभूषण संजीव माने यांनी सांगितले.

ऊस उत्पादनामध्ये सरीला अत्यंत महत्त्व आहे. मध्यम आणि हलक्या जमिनीमध्ये साडेचार फूट, काळ्या जमिनीमध्ये पाच फूट तर भारी जमिनीमध्ये सहा फूट सरीचा अवलंब करताना उसाला सूर्यप्रकाश कसा मिळेल, यावर भर देण्याची गरज असल्याचे माने यांनी सांगितले.

मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार म्हणाले, कृष्णा कारखाना चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादन वाढीसाठी फ्लिड स्टाफ आपल्या दारी उपक्रम राबवित आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या कारखान्याच्या माध्यमातून कृषी महाविद्यालयातून शेतीचे शिक्षण देण्यात येते. या महाविद्यालयात शिकलेल्या विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे गाठली आहेत. ते विद्यार्थी ग्रामीण भागाशी नाळ जुळवून आहेत.

संचालक बाबासो शिंदे यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी मोहन निकम (शेरे), अजय मोहिते (रेठरे बुद्रुक), संचालक जे. डी.मोरे (रेठरे हरणाक्ष), तानाजी माळी (रेठरे हरणाक्ष) या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी विद्यार्थ्यांनी कृषिचे महत्व सांगणारे पथनाट्य सादर केले. कॉलेजचे प्राचार्य डॉ.अशोक फरांदे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. अमोल मंडले यांनी केले. प्रा. डॉ.सारंग कुंभार यांनी आभार मानले.

Related Articles