श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा मंडळामार्फत आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा २०२४-२५ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार समारंभ मलकापूर येथे नुकताच पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी आपल्या मनोगतात, “टोकाची बुद्धिमत्ता असणारा वर्ग म्हणजे श्री मळाई शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी,” असे गौरवोद्गार काढले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागील शाळा, शिक्षक आणि पालकांच्या योगदानाचे विशेष कौतुक करत संस्थेच्या गुणवत्तावर्धक उपक्रमांचा आढावा घेतला.
संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका डॉ. स्वाती थोरात यांनी पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या शिष्यवृत्ती परीक्षेचा उद्देश ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे, असल्याचे सांगितले. या परीक्षेच्या यशस्वी आयोजनामुळे सामान्य कुटुंबातील मुले उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, शिवशंकर ज्वेलर्स कराडचे अविनाश जगताप, प्रियांका जगताप, केंद्रप्रमुख गणेश जाधव, संचालक सौ. शालिनी थोरात, पर्यवेक्षण प्रमुख आर.ए. कुंभार, चंद्रकांत कुंभार, भगवानरव पवार, पत्रकार अतुल काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. नीट पात्र विद्यार्थिनी सिद्धीका मुर्सल व इतर हितचिंतक पालक व विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, सूत्रसंचालन सौ. सविता कोळी व सौ. कविता थोरात, सौ. करुणा शिर्के यांनी आभार मानले.
शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता सातवी (मराठी माध्यम) आर्या पवार – प्रथम (कन्या शाळा मलकापूर), वरदराज शिंदे – द्वितीय (आनंदराव विद्यालय पोतले) जान्हवी मोरे – तृतीय (आ.च. विद्यालय मलकापूर), संस्कृती गरुड, वेदिका गरुड, स्वस्ती देशमुख – उत्तेजनार्थ, इयत्ता चौथी (मराठी माध्यम) अंशुल शिंदे – प्रथम (आदर्श प्राथमिक आगाशिवनगर), मंथन गरुड – द्वितीय, त्रिशा शिर्के – तृतीय, विराज पाटील व श्रेयस चव्हाण – उत्तेजनार्थ, इयत्ता सातवी (इंग्रजी माध्यम) सबा डांगे – प्रथम, धैर्यशील शिंदे – द्वितीय, समर्थ गुरव – उत्तेजनार्थ, इयत्ता चौथी (इंग्रजी माध्यम) अनुश्री साळुंखे व विश्वराज पवार – प्रथम, आराध्या वाळके – उत्तेजनार्थ. या कार्यक्रमात मागील वर्षीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रत्येकी एक हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उत्कृष्ट नियोजन हेच यशाचे गमक
माध्यमांशी संवाद साधताना डॉ. स्वाती थोरात यांनी, “शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा त्रिवेणी संगम, तसेच संस्थेचे प्रभावी नियोजन, हेच श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा योजनेच्या यशाचे गमक आहे.” परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होत असल्याचा त्यांनी पुनःउल्लेख केला.