सातारा जिल्हाहोम

पीओपी मूर्तीवरील बंदी उठवल्याबद्दल महायुती सरकारचे कुंभार समाजाकडून आभार

कराड/प्रतिनिधी : –

प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्ती बनवण्यावरील बंदी हटवल्याबद्दल कराड येथील कुंभार समाजाकडून महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले. पारंपरिक व्यवसायाला चालना देणारा आणि अनेक कुंभार कुटुंबांना दिलासा देणारा हा निर्णय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कुंभार समाजाच्या पारंपरिक मूर्ती निर्मिती व्यवसायास गेल्या काही वर्षांपासून मर्यादा आल्या होत्या. पर्यावरणविषयक नियमांच्या पार्श्वभूमीवर POP मूर्तींवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, या निर्णयामुळे कुंभार समाज अडचणीत सापडला होता. अनेक कुटुंबांचे रोजगाराचे साधन बंद होण्याच्या स्थितीत आले होते.

कुंभार समाजाच्या या प्रश्नाची दखल घेत महायुती सरकारने POP मूर्तींवरील बंदी उठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे पारंपरिक मूर्तिकलेला चालना मिळणार असून, समाजाचा सांस्कृतिक वारसा जपला जाणार आहे, असे कुंभार समाजातील नागरिकांनी सांगितले.

या निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा करून शासनदरबारी कुंभार समाजाची भूमिका प्रभावीपणे मांडणारे सुदर्शन पाटसकर यांचेही समाजाकडून विशेष आभार मानण्यात आले. त्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाला कराड येथील समस्त कुंभार समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related Articles