पांडुरंग देशमुख यांचे निधन

कराड/प्रतिनिधी : –
कापील (ता. कराड) गावातील सर्वमान्य नेते, गोकाक पाणी पुरवठा संस्था व कापील वि.वि.कार्य.सह. सेवा सोसायटीचे माजी चेअरमन आणि माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गणपती देशमुख (आप्पा) शनिवार (दि. २१) जून रोजी वयाच्या ६० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने गावाने एक खंबीर आणि तळमळीचा नेता गमावला आहे.
पांडुरंग देशमुख हे ‘आप्पा’ या नावाने सर्वत्र परिचित होते. त्यांचे गावासाठी असलेले प्रेम, निस्वार्थी सेवाभाव आणि प्रत्येक विकासकामात घेतलेली सक्रियता ही सर्वांसाठी प्रेरणादायी होती. गावाच्या २४ बाय ७ शुद्ध पाणीपुरवठा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीत त्यांचे योगदान मोलाचे होते. ते जेष्ठ नेते आणि कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनदादा मोहिते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जात होते. राजकारणात स्पष्ट भूमिका, सामाजिक कामात तळमळ आणि लोकांशी ऋणानुबंध जपणारा सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांची एक वेगळी छाप होती.
आप्पांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रक्षाविसर्जन विधी सोमवार (दि. २३) जून रोजी सकाळी ९ वाजता कापील येथे होणार आहे.