सातारा जिल्हाहोम

विजयनगर येथे भव्य योग सत्र उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

पार्वती मल्टीपर्पज हॉल, विजयनगर येथे ‘जागतिक योग दिना’निमित्त भव्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. विजयनगर ग्रामपंचायत, विजयनगर शिक्षण प्रसारक मंडळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर, तसेच इंटर्नल फिटनेस स्टुडिओ कराड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

योग दिनानिमित्त योगाचे आरोग्यदायी फायदे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योग साधनेमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यात होणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमात इंटर्नल फिटनेस स्टुडिओचे योग प्रशिक्षक श्री. शंतनू कालेकर यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांकडून योगाभ्यास करवून घेतला.

 

या कार्यक्रमात प्रेमलाकाकी माध्यमिक विद्यालय, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विजयनगरसह पाडळी, मुंढे, वारुजी, कराड येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप दिले. सैदापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोहनराव जाधव यांनी योग साधनेचे मानसिक ताण, डिप्रेशन, चिंता आणि मनःशांती यावर होणाऱ्या परिणामांविषयी मार्गदर्शन केले. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले व माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या पुढाकारातून अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात बोलताना आमदार आनंदराव पाटील म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २१ जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो आहे. योग साधनेमुळे मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे शरीर निरोगी राहते. विशेषतः तरुणांमध्ये करिअरसंदर्भातील संभ्रम, तणाव यावर मात करण्यासाठी योग हे प्रभावी साधन आहे.” यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना व नागरिकांना रोज योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी कार्यक्रमास कृष्णा कारखान्याचे संचालक वसंतराव शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, अॅड. ए. व्हाय. पाटील, माजी सरपंच मोहनराव जाधव, दादासाहेब शिंगण, प्रमोद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी मुलाणी, सरपंच सौ. सुनंदा शेळके, सौ. अनिता संकपाळ, सौ. उषाताई पाटील, तसेच परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत उपसरपंच मानसिंग पाटील, सुत्रसंचालन करून जांभळे सर यांनी आभार मानले.

Related Articles