सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
यशस्वी उद्योजिका सौ. तेजस्वी घुटुकडे यांना “अहिल्यारत्न 2025” पुरस्काराने सन्मान
148 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
शिरसगाव येथील यशस्वी महिला उद्योजिका सौ. तेजस्वी किरण घुटुकडे यांना “अहिल्यारत्न 2025” या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात सौ. घुटुकडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन्मान सोहळा दि. 15 जून रोजी कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सौ. तेजस्वी घुटुकडे यांना पुरस्कार व सन्मानचिन्ह प्रदान करून ट्रस्टच्या वतीने त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली.
सौ. घुटुकडे यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर शिरसगावसारख्या ग्रामीण भागात “गुरुकृपा काजू प्रक्रिया उद्योग” सुरू केला. त्यांनी आधुनिक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीचा वापर करून या उद्योगाचा विस्तार करत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आपल्या काजू व्यवसायाची ठसा उमटवला आहे. त्यांच्या उद्योगातून स्थानिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, त्यांनी एक आदर्श महिला उद्योजिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी दिलेला नारीशक्तीचा आदर्श आजच्या काळातही प्रेरणादायी ठरत आहे. सौ. तेजस्वी घुटुकडे यांचे कार्य आणि त्यांना मिळालेला “अहिल्यारत्न” पुरस्कार हा ग्रामीण भागातील महिला उद्योजकतेसाठी निश्चितच प्रेरणास्त्रोत ठरेल, असा विश्वास ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
148 1 minute read