सातारा जिल्हाहोम

कराडमध्ये आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित विशेष मेळावा उत्साहात

प्रशासनाच्या उपस्थितीत तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –

कराड तहसील कार्यालयात मंगळवारी आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सैनिकांच्या समस्या, तक्रारी व अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.

सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी आणि अमृत वीर जवान अभियानाचे शासकीय सदस्य प्रशांत कदम यांनी या मेळाव्याची मागणी केली होती. या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी प्रताप पाटील, उपविभागीय भूमी अभिलेख अधिकारी प्रवीण पवार, नायब तहसीलदार बाबुराव राठोड, तहसील कार्यालयातील राजेंद्र चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय साताऱ्याचे गोरखनाथ जाधव, दिलीप पाटील, तसेच पोलिस व कृषी विभागासह इतर सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आजी-माजी सैनिक, तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी विविध प्रश्न मांडले. त्या प्रश्नांचे निराकरण प्रशासनाच्या वतीने तत्काळ करण्यात आले. विशेष म्हणजे, ही बैठक सुसंगत, सकारात्मक व सविस्तर चर्चा करत पार पडली.

याप्रसंगी सैनिक संघटना कराड तालुक्याचे अध्यक्ष सदाशिव नागणे, उपाध्यक्ष सचिन माने, विजय पाटील, तसेच चिखली येथील सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष भीमराव सावंत यांच्याहस्ते उपस्थित अधिकारी व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन (नि.) सुभेदार राजाराम माळी, सदाशिव नागणे यांनी आभार मानले. या मेळाव्यास मोठ्या संख्येने सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Related Articles