वाठार येथे पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता, जनजागृती व वृक्षारोपण

कराड/प्रतिनिधी : –
वाठार (ता. कराड) येथे ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाठार ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यामध्ये स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यानंतर प्लास्टिक निर्मूलन व प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. गावातील दुकानदारांना प्लास्टिक वापराविरोधात नोटिसा देऊन कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. याशिवाय गावामध्ये वृक्षारोपणही करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी सरपंच सौ. भाग्यश्री पाटील, उपसरपंच स्वप्निल कानडे, सदस्य शंकर देसाई, मुलाणी मॅडम, अंगणवाडी सेविका, ग्रामसंघाच्या पदाधिकारी सौ. तावरे, सौ. आवळकर मॅडम, ग्रामपंचायत अधिकारी संजय लिंबळे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राबवलेले उपक्रम ग्रामस्थांकडून कौतुकास पात्र ठरले असून या उपक्रमाच्या माध्यमातून गावात पर्यावरणाबाबत जागरूकतेचा सकारात्मक संदेश देण्यात आला.