सातारा जिल्हाहोम

बकरी ईद कराड व परिसरात उत्साहात साजरी

कराड/प्रतिनिधी : –

बकरी ईद पारंपरिक पद्धतीने कराड शहर व परिसरात शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली. बकरी ईदनिमित्त येथील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले. या सणानिमित्त शहर व परिसरातील अनेक मस्जिदमध्ये विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्या आले होते.

ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद हा सण पैगंबर इब्राहिम यांच्या बलिदानाचा आणि त्यांच्या अल्लाहवरील निष्ठेचा स्मरण दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. कराड शहरामध्ये प्रतिवर्षी बकरी ईदचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. यंदाही हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. बकरी ईदनिमित्त शहरातील मुस्लीम बांधवांच्यावतीने सकाळी साडेसात वाजता चावडी चौकातील जामा मस्जिद येथून झेंडा मिरवणूक काढण्यात आली. चावडी चौक, आझाद चौक, यशवंत हायस्कूल पासून हेडपोस्ट, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे पुतळा, राज मेडिकल, विजय दिवस चौक ते ईदगाह मैदान असा या मिरवणूकाचा मार्ग होता. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

गेली तीन वर्षे पावसामुळे बकरी ईद सणादिवशी ऐतिहासिक ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांना सामुदायिक नमाज पठण करता आले नव्हते. यंदा पावसाने उघडीप दिल्याने सकाळी ८.३० वाजता ईदगाह मैदानावर शाही इमाम हफीज अब्दुल अय्याज मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड व परिसरातील हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन सामुदायिक नमाज अदा केली. त्यानंतर एकमेकांना भेटून बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजेंद्रसिंह यादव मित्र परिवाच्यावतीने मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देऊन बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच शहरातील वाहतुकीला, तसेच नागरिकांना कोणताही अडथळा होवू नये, म्हणून पोलिसांनी नेमून दिलेल्या दहा ठिकाणी मुस्लीम बांधवांनी बकरी ईदची कुर्बानी दिली. या कुर्बानीसह शहरात काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. तसेच कराड शहर परिसरातील मलकापूर, ओगलेवाडी, वाघेरी, गोटे आदी गावांत बकरी ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

Related Articles