कृष्णा विश्व विद्यापीठाने वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात देशपातळीवर ओळख निर्माण केली – राज्यपाल राधाकृष्णन
कृष्णा विश्व विद्यापीठाचा १३ वा दिक्षांत सोहळा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
कृष्णा विश्व विद्यापीठाने वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात देशपातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विद्यापीठाला मिळालेली विविध राष्ट्रीय पातळीवरील मानांकने ही विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवेसाठीची आदर्श प्रतीके आहेत, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले.
कराड येथे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या १३ व्या दिक्षांत सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. कृष्णा विद्यापीठाच्या प्रांगणात हा दिक्षांत सोहळा रंगला. पोलिस बॅन्डपथकाच्या मानवंदनेत प्रमुख पाहुण्यांना समारंभस्थळी नेण्यात आले. व्यासपीठावर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री. विनायक भोसले, प्रा. श्रीनिवास बल्ली, दिलीप पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात विद्यापीठातील विविध अधिविभागातील १०६२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये ३० विद्यार्थ्यांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या २५ विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी दूरदृष्यप्रणाली द्वारे बोलताना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही आज तुमच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. तुमचे पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो, कारण त्यांच्या सततच्या पाठिंब्यामुळेच ही कामगिरी शक्य झाली आहे. प्रामाणिकपणे, करुणेने व व्यावसायिकतेने समाजाची सेवा करा आणि शक्य असेल तर एक परदेशी भाषा नक्की शिका. कारण ती तुमच्या करिअरसाठी व जागतिक दृष्टिकोनासाठी फारच उपयुक्त ठरेल.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा विश्व विद्यापीठाने एक वैद्यकीय महाविद्यालय ते स्वयंपूर्ण विद्यापीठ असा उल्लेखनीय प्रवास पार करत, देशातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. येत्या काही वर्षांत विद्यापीठाचे नवे कॅम्पस उभारले जात असून, त्याठिकाणी माहिती तंत्रज्ञान, व्यावसायिक शिक्षण व कौशल्याधारित अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सन २०२७-२८ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची पहिली बॅच या नवीन कॅम्पसला प्रवेश घेईल, असा आम्हाला विश्वास आहे. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून, अनेकांनी पदव्युत्तर व सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमांमध्ये यश मिळवले आहे. त्याचबरोबर विद्यापीठाचे प्लेसमेंट रेकॉर्डही उत्तम असून, विद्यार्थ्यांना देशभरातील नामांकित रुग्णालये, संशोधन संस्था व आरोग्य विज्ञान संस्थांमध्ये संधी मिळत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने, बहुविषयक शिक्षणाला चालना देण्याच्या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्नशील आहे. पर्यावरण रक्षण, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्या यासारख्या विषयांवरही विद्यापीठ विशेष लक्ष केंद्रित करत आहे.
विद्यापीठाच्या गेल्या वर्षांतील प्रगतीचा आढावा घेताना कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा म्हणाल्या, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना फक्त ज्ञानच नव्हे; तर मूल्याधिष्ठित नेतृत्वाची प्रेरणाही दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाचे नाव उंचाविले आहे.
कार्यक्रमाला सौ. उत्तरा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, ॲड. बी. डी. पाटील, कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, शिवाजीराव थोरात, कृष्णा विद्यापीठाच्या संशोधन संचालिका निवृत्त ब्रिगेडियर डॉ. जी. हिमाश्री, डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा वैद्यकीय विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. युगंतरा कदम, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे, फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. रेणुका पवार, डॉ. टी. पूविष्णू देवी, डॉ. ज्योती साळुंखे, डॉ. स्नेहल मसूरकर, डॉ. अक्षदा कोपर्डे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. सत्यजीत पवार, जयश्री ननावरे यांच्यासह विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :
समुदाय प्रकल्पांतर्गत १४ हजार महिलांची वैद्यकीय तपासणी
आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यात कृष्णा विश्व विद्यापीठ नेहमीच अग्रेसर राहिले असून, ग्रामीण भागातील हजारो महिलांच्या कर्करोग तपासणी व उपचारासाठी विविध प्रयत्न केले जात असल्याची माहिती कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या भाषणात दिली. विद्यापीठाच्या समुदाय प्रकल्पांतर्गत जवळपास १४,००० महिलांची वैद्यकीय तपासणी केल्याचेही त्यांनी सांगितले.