सातारा जिल्हाहोम

“कृष्णा हॉस्पिटल हे मंदिर, सुरेशबाबा हे देव” — रुग्णांचे मनोगत

कराड/प्रतिनिधी : –

‘मला जेव्हा कॅन्सर झाल्याचं समजलं तेव्हा मी प्रचंड घाबरले. आता आणखी किती दिवसांचं आयुष्य जगायला मिळणार या भितीनं कॅन्सरच्या उपचारांसाठी मी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखवायला आले. पण इथं आल्यावर मात्र मला डॉ. सुरेशबाबांच्या रुपाने साक्षात देव भेटला. एवढा मोठा व्याप सांभाळणाऱ्या सुरेशबाबांनी माझ्यासारख्या सामान्य रुग्णावर केवळ उपचार केले नाहीत. तर या सगळ्या भितीच्या काळात मला वडिलांच्या मायेने धीर दिला.. आधार दिला.. आणि या संकटातून मला सहीसलामत बाहेर काढलं. आज त्यांच्यामुळे मी कॅन्सरमुक्त झाले असून, पूर्णपणे निरोगी व आत्मविश्वासाने आनंदी आयुष्य जगत आहे’, अशा भावोत्कृट शब्दांमध्ये अनेक माता-भगिनींनी डॉ. सुरेश भोसले यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती आणि प्रख्यात कर्करोग उपचार तज्ज्ञ डॉ. सुरेश भोसले यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कर्करोग आधार गटाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमध्ये कर्करोगाबाबत जागृती व्हावी आणि योग्य उपचाराने कर्करोगापासून मुक्त झालेल्या महिलांच्या अनुभवांतून सध्या कॅन्सरग्रस्त असलेल्या रूग्णांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी राज्याचे माजी क्रीडा मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, सौ. उत्तरा भोसले, सौ. सुवर्णादेवी देशमुख, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कर्करोग विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर, डॉ. रश्मी गुडूर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात डॉ. सुरेश भोसले यांनी केलेल्या उपचारामुळे कर्करोगमुक्त झालेल्या अनेक महिलांनी कर्करोगाविरुद्धची लढाई कशी जिंकली, याबद्दल आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखालील कृष्णा हॉस्पिटलमधील कॅन्सर टीम वर्ल्ड क्लास असून, एक कुटुंबप्रमुख म्हणून ते नेहमी प्रत्येक रुग्णाला धीर देतात. कुटुंबातील सदस्याप्रमाणे ते आपुलकीने काळजी घेतात. कॅन्सर म्हणजे फुलस्टॉप नाही, तर विश्रांतीचा एक स्वल्पविराम आहे. त्यामुळे सकारात्मक आयुष्य जगा. कृष्णा हॉस्पिटल माझ्यासाठी मंदिर आहे आणि सुरेशबाबा हे त्या मंदिरातील देव आहेत. अशा भावना व्यक्त करत या महिलांनी त्यांना उपचारकाळात डॉ. सुरेशबाबांनी दिलेला आधार व नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न, तसेच केलेले सुयोग्य उपचार याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, रुग्णाला जेव्हा कॅन्सर झाल्याचे समजते तेव्हा साहजिकच त्याच्या मनात दु:खाची भावना निर्माण होते. आपण आणखी किती वर्षे जगणार, या भितीने रुग्ण नैराश्येकडे ढकलला जातो. पण आजच्या काळात वैद्यकीय शास्त्र अधिक प्रगत बनले आहे. वेळेवर निदान, योग्य उपचाराने दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगता येते. त्यामुळे कॅसरग्रस्त रुग्णांनी भिती न बाळगता उपचारासाठी पुढे यावे आणि आनंदी आयुष्य जगण्याचा आनंद घ्यावा.

याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, कराडच्या माजी नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, वसंतराव शिंदे, ज्येष्ठ उद्योजक आर. टी. स्वामी, कृष्णा विद्यापीठाच्या संशोधन संचालिका ब्रिगेडियर डॉ. जी. हिमाश्री, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर, प्राचार्य डॉ.सौ. वैशाली मोहिते, डॉ. जी. वचरदराजूलू, रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष रामचंद्र लाखोले, सेक्रेटरी आनंदा थोरात, रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे अध्यक्ष चंद्रशेखर दोडमणी, विजय चव्हाण, सलीम मुजावर, राहुल जामदार यांच्यासह मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

डॉ. प्रणिता पाटील यांनी स्वागत केले. मुख्य नर्सिंग ऑफिसर रोहिणी बाबर यांनी प्रास्तविक केले. डॉ. सुजाता कानिटकर यांनी आभार मानले.

Related Articles