विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमध्येच मिळणार शैक्षणिक दाखले – प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी

कराड/प्रतिनिधी : –
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांनातर्गत कराड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच आवश्यक दाखले मिळणार आहेत. त्यासाठी महसूल विभागामार्फत विविध प्रकारचे दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
प्रांताधिकारी श्री. म्हेत्रे म्हणाले, तालुक्यात शाळांची संख्या 131 असून दहावी विद्यार्थ्यांची संख्या 7994 आहे. महाविद्यालयांची संख्या 40 असून बारावी विद्यार्थ्यांची संख्या 8687 आहे. तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या 16681 इतकी आहेत. या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयीन प्रवेशांसह अन्य शैक्षणिक कामांसाठी उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, डोंगरी दाखला आदी आवश्यकता दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थीनी व त्यांच्या पालकांना अनेक अद्चंनिंचा सामना करावा लागतो. शिवाय वेळ व पैसाही वाया जातो. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान 2025 – 26 अंतर्गत दाखले वाटप कार्यक्रम आखला आहे. त्यानुसार गाव पातळीवरच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये एसडीआरचे दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी कराड प्रांत कार्यालयाने सर्व शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य, महा-ई-सेवा केंद्र चालक, तसेच मंडल अधिकारी, शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे संबंधित गावातील शाळेचे मुख्याध्यापक व महाविद्यालय स्तरावर प्राचार्य यांच्याकडे जमा करावयाचे आहेत. या कागदपत्रांची पडताळणी महा- ई- सेवा केंद्र चालक शाळेत जाऊन करतील. यानंतर महा-ई-सेवा केंद्र चालक या कागदपत्रांची तपासणी करून ती अपलोड करतील. प्रांत कार्यालयामार्फत सर्व कागदपत्रांची तपासणी होऊन सेवा केंद्रांमार्फतच हे दाखले एक गठ्ठा शाळा, महाविद्यालयांमध्ये पोहोचले जातील. तेथून ते विद्यार्थ्यांना दिले जातील. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी आता कराड शहरात दाखले काढण्यासाठी येण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सर्व कागदपत्रे घेऊन शाळेचे मुख्याध्यापक व महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडे जमा करावीत, असे आवाहनही प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी यावेळी केले. कागदपत्र जमा झाल्यानंतर त्याची पडताळणी होऊन पुढील चार दिवसांत विद्यार्थ्यांना दाखले देण्याची व्यवस्था केली जाईल, असेही श्री. म्हेत्रे यांनी सांगितले.