खते बनवण्याच्या नावाखाली, गुन्हेगारीचा बाजार – पोलिसांचा छापा, ६.३५ कोटींचं कोकेन जप्त
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कराड / प्रतिनिधी –
कराड तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीमध्ये खते तयार करणाऱ्या कंपनीच्या आडून कोकेनसारख्या घातक अमली पदार्थांचा साठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तळबीड पोलिसांनी शुक्रवारी (२३ मे) अत्यंत गोपनीयपणे केलेल्या कारवाईत ‘सुर्यप्रभा फॉर्मकेन’ या कंपनीमधून तब्बल १२७० ग्रॅम कोकेन जप्त केलं आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्याने किंमत सुमारे ६ कोटी ३५ लाख रुपये आहे.
ही कारवाई केवळ कराड परिसरासाठीच नव्हे, तर संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी मोठ्या खळबळजनक घडामोडींपैकी एक ठरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार (NDPS Act) कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
कंपनीच्या नावाखाली अमली पदार्थांचा साठा
तासवडे एमआयडीसीमधील बी-५६ ब्लॉकमध्ये ‘सुर्यप्रभा फॉर्मकेन’ ही कंपनी आहे. ही कंपनी शेतीसाठी खते तयार करते, असा मुखवटा वापरून तिथे अवैधपणे कोकेनचा साठा केला जात होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर त्यांनी तातडीने नियोजनबद्ध कारवाई केली आणि कंपनीवर छापा टाकला. या वेळी अति सावधगिरीने परिसराची झडती घेण्यात आली.
छाप्यात पांढऱ्या रंगाच्या पावडरच्या स्वरूपात १२७० ग्रॅम कोकेन मिळून आलं, जे तांत्रिक चाचणीद्वारे कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.
तपास अधिक खोलवर सुरू
या कारवाईनंतर पोलिसांनी कंपनीतील संबंधित पाच जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हे कोकेन कुठून आणले गेले, कोणत्या मार्गाने आणि कोणत्या हेतूने येथे साठवले गेले, याचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हातात सापडलेल्या पुराव्यांवरून हे कोकेन विक्रीसाठी बाळगण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही
या तळबीड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी करत होते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि गोपनीयता राखून ही धाड टाकण्यात आली. या यशस्वी कारवाईनंतर तळबीड पोलिसांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तासवडे एमआयडीसी येथील २१ मे रोजी सायंकाळी ४.२५ च्या सुमारास तासवडे हद्दीत अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव ता. जिल्हा सातारा यांच्या मालकीचे सूर्यप्रभा फार्म केम कंपनीत ६ कोटी ३५ लाख रुपये किमंतीचे १२७० ग्रॅमच्या कोकेन विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशीर रित्या कंपनीत मिळून आले. कंपनी मालक अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव, समीर सुधाकर पडवळ राहणार वृंदावन सिटी मलकापूर कराड, रमेश शंकर पाटील राहणार मल्हारपेठ ता. पाटण, जीवन चंद्रकांत चव्हाण रा. आवार्डे ता. पाटण, विश्वनाथ शिपणकर रा. दौंड जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे.
सातारा जिल्हा पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा
या प्रकारामुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत काय घडतंय याकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं आहे. सातारा जिल्हा पोलिस दलाने यापुढे अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले असून, इतर औद्योगिक कंपन्यांचीही चौकशी होण्याची शक्यता.