कराडचे बसस्थानक आदर्शवत करण्यासाठी प्रयत्नशील – आमदार डॉ. अतुलबाबा भोसले
नवीन पाच एसटी बसेसचे लोकार्पण

कराड/प्रतिनिधी : –
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या कराड बसस्थानकातील प्रवासी व कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच येत्या काळात कराड बसस्थानक हायटेक करून राज्यात आदर्शवत बसस्थानक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांतून कराड आगाराला मिळालेल्या नवीन पाच एसटी बसचे लोकार्पण आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ, रणजीत पाटील, राजेंद्र यादव, राजेंद्र माने, काकासाहेब जाधव, आगार व्यवस्थापिका शर्मिष्ठा पोळ, विक्रम हांडे, सागर पांढरपट्टे, चालक, वाहक, सर्व एसटी कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, कराड बस स्थानकातून दररोज पाच ते सहा हजार लोक प्रवास करतात. परंतु, आगारात कमी बसेस असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. त्यानुसार प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी कराड आगाराला बस उपलब्ध करून देण्यासाठी आपण स्वत: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. यावर मंत्री श्री. सरनाईक यांनी तत्काळ कराड आगाराला पाच बस उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. त्याचा आज लोकार्पण सोहळा पार पडला. दरम्यान, आपण कराडसाठी आणखी पाच बसेस देण्याची मागणी मंत्री श्री. नाईक यांच्याकडे केल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी यावेळी सांगितले.
आमदार मनोज घोरपडे म्हणाले, प्रवाशांच्या सोयीसाठी आपण कटीबद्ध असून कराडला आणखी पाच बस व आवश्यक कर्मचारी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
आणखी एका बसस्थानकासाठी प्रयत्नशील
कराड तालुका विस्ताराने मोठा आहे. तसेच कराड बसस्थानकातील प्रवाशांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय व्हावी, यासाठी कराड परिसरात आणखी एक बसस्थानक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच याबाबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले.