चिपळूण नागरीच्या क्रिकेट स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न
इलेव्हन फायटर पश्चिम विभाग,वाशिष्ठी इलेव्हन विजेता, रॉयल चॅलेंज मध्य विभाग,रायझिंग स्टार उपविजेता

चिपळूण / प्रतिनिधी : –
सहकार क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेल्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा अंतर्गत क्रिकेट स्पर्धेने चिपळूणचे पवन तलाव मैदान अक्षरशः गाजवून सोडले. प्रकाशझोतात सलग दोन दिवस पार पडलेल्या या स्पर्धेत पहिल्या गटात वाशिष्ठी इलेव्हन तर दुसऱ्या गटात इलेव्हन फायटर पश्चिम विभाग हे दोन संघ विजेता ठरले. तर रायझिंग स्टार व रॉयल चॅलेंजर मध्य विभाग उपविजेता ठरले. या चारही संघांना मान्यवरांच्या हस्ते जल्लोशी कार्यक्रमात गौरवण्यात आले.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेकडून संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ.स्वप्ना यादव यांच्या नियोजनाखाली प्रत्येकवर्षी ३० एप्रिल व १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शाखा अंतर्गत क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येते. यास्पर्धेत संस्थेचे कर्मचारी व अधिकारी असे वेगवेगळे संघ सहभागी होत असतात. यावर्षीदेखील दरवर्षीप्रमाणे व आतंरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने चिपळूण नागरी प्रीमियम लीग २०२५ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वाशिष्ठी डेअरीच्या कर्मचाऱ्यांनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तसेच पत्रकार व वकील संघ देखील स्पर्धेत उतरले होते. त्यामुळे ही स्पर्धा अधिक भव्यदिव्य बनली. या स्पर्धेत एकूण १८ संघांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक संघाला एक वेगळा ड्रेसकोड देण्यात आला होता. तसेच स्पर्धेचे नियोजन व मैदानाची सजावट, प्रेक्षक गॅलरी, विद्युत व्यवस्था पाहता एखाद्या मोठ्या व्यवसायिक स्पर्धेचे स्वरूप या स्पर्धेला प्राप्त झाले होते. बुधवारी सायंकाळी सर्वप्रथम पेहलगाम येथील शाहिदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर राष्ट्रगीत आणि बहारदार कार्यक्रमात या स्पर्धेचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले आणि स्पर्धेला सुरुवात झाली. प्रत्येकी ६ षटकांच्या सामन्यात उत्तोरोत्तर रंगत निर्माण झाली. पहिल्या दिवशीचे सर्व सामने रंगतदार झाले.तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र् दिनानिमित्त राज्यगीत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य गीताने सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशीचे सर्व सामने चुरशीचे व उत्कंठा वर्धक झाले. चिपळूण नागरीच्या कर्मचाऱ्यांनी अप्रतिम कौशल्य दाखवत उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे क्रीडारसिकांनी देखील मनमुराद आनंद घेतला. विशेष म्हणजे दोन्ही दिवस सुभाषराव चव्हाण,सौ.स्मिता चव्हाण,वाशिष्ठी चे चेअरमन प्रशांत यादव, पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ,तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या निमित्ताने जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे व सहाय्यक निबंधक सुशांत घोलप यांनी देखील स्पर्धेला सदिच्छा भेट देत या स्पर्धेचे कौतुक केले. तर सौ.स्वप्ना यादव सतत मैदानात आपल्या कर्मचाऱ्यांसह तळ ठोकून नियोजन करत होत्या. प्रत्येकाचे अगत्याने स्वागत केले जात होते. अमोल टाकळे यांचे सूत्रसंचालन आणि प्रशांत आदवडे यांच्या बहारदार समालोचनामुळे स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर पोहचली होती. गुरुवारी रात्री स्पर्धेचे उपांत्य फेरी व अंतिम फेरीचे सामने खेळवण्यात आले. तसेच चिपळूण फिटनेस क्लब आणि चिपळूण नागरी इलेव्हन व चिपळूण वकील संघ आणि वाशिष्टी डेअरी इलेव्हन असे दोन प्रेक्षणीय सामन्यामध्ये चिपळूण फिटनेस क्लब आणि चिपळूण वकील संघ विजयी झाले. दोन गटामध्ये स्पर्धा पार पडली त्यामध्ये दोन अंतिम सामने खेळवण्यात आले. पहिला अंतिम सामना वाशिष्ठी इलेव्हन व रायझिंग स्टार यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यात वाशिष्ठी इलेव्हन विजेता ठरला.तर दुसरा अंतिम सामना इलेव्हन फायटर आणि रॉयल चॅलेंज यांच्यामध्ये झाला.या सामन्यात इलेव्हन फायटर ने ३ धावांनी रोमहर्षक विजय प्राप्त केला. विजेता दोन्ही संघांना सुभाषराव चव्हाण, सौ.स्मिता चव्हाण, प्रशांत यादव,स्वप्ना यादव,ऍड.नयना पवार, अशोक साबळे,सत्यवान म्हामूनकर, सोमा गुडेकर,मनोहर मोहिते,राजेश वाजे, रविंद्र भोसले, प्रकाश साळवी,प्रकाश पत्की,नीलिमा जगताप, राजेंद्र पटवर्धन,वैभव चव्हाण व संचालक मंडळाच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मालिकविर म्हणून सुहास कडव,अमित बुरबाडकर, सामनावीर-रुपेश काजवे,सुहास कडव,तर उत्कृष्ट फलंदाज अमोल महाडिक, रुपेश काजवे,उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून संदेश पाटोळे,-अमित बुरबाडकर यांना सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे इलेव्हन फायटर संघाने सलग ५ व्या वर्षी चिपळूण नागरी चषकावर आपले नाव कोरले. चिपळूण नागरी प्रीमियम लीग २०२५ या क्रिकेट स्पर्धेचे क्रीडा रसिकांनी कौतुक केले आहे.