सातारा जिल्हाहोम

एकोणसत्तर वर्षीय स्वच्छतादूताचा कराडमध्ये सन्मान 

कराड/प्रतिनिधी : –
वयाच्या ६९ व्या वर्षी दुचाकीवरून राज्यभ्रमंती करणारे स्वच्छतादूत यशवंत कन्हेरे यांचे रविवारी कराडमध्ये आगमन झाले. यावेळी त्यांचा सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज संघटनेकडून सत्कार करण्यात आला.
यशवंत कन्हेरे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत. स्वच्छता आणि रस्ता सुरक्षिततेबाबत ते प्रबोधन करत आहेत. त्यांच्या या कार्याची संघटनेकडून प्रशंसा करण्यात आली. दि. २३ फेब्रुवारीपासून कन्हेरे यांनी या मोहिमेस प्रारंभ केला आहे. कराड शहरात सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज संघटनेने केलेल्या सत्कारबाबत श्री कन्हेरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे स्वछता अभियान, तसेच रस्ता सुरक्षा अभियान या कार्याचे ब्रँड अॅम्बेसिडर असलेल्या यशवंत कन्हेरे यांनी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे. फक्त त्यांनी सातारा या ३१ व्या जिल्ह्यातील कराड शहरात प्रवेश केला. त्यांच्या या कार्याचे कौतुक करण्यासाठी कराडमधील सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजबांधवांतर्फे कार्वे नाका येथील राजेंद्र सूर्यवंशी यांच्या घरी उमेश ठोंबरे, अलोणे सर, यंदे काका, चेतन चव्हाण, श्रीकांत जगताप, सौ. पूनम जगताप व सौ. आरती मडीलगेकर – सूर्यवंशी, संजय मडीलगेकर, ऐश्वर्या मडीलगेकर यांच्या उपस्थितीमध्ये श्री. कन्हेरे यांच्या कार्याचे कौतुक करून समाजबांधवांनी सन्मान करत पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या.
या अवलियाने या वयात केलेला दुचाकी प्रवास हा आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी आहे. प्रवासादरम्यान आलेले अनुभव त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर व्यक्त केले. तसेच स्वच्छता व रस्ते सुरक्षिततेबाबत त्यांनी यावेळी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.
बहुमूल्य संदेश 
या प्रवासादरम्यान श्री. यशवंत कन्हेरे हे जलस्त्रोतांचे प्रदूषण थांबवा, झाडे लावा पर्यावरण वाचवा, प्लास्टिक टाळा, कापडी पिशव्यांचा वापर करा, गडकोट व किल्ले संवर्धनातून इतिहास वाचवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, अन्न वाया घालवू नका, पाण्याचा योग्य वापर करा, प्राणी वाचवा, सायकल चालवून आरोग्य निरोगी ठेवा, हेल्मेट वापरा, सीटबेल्ट लावून जीव वाचवा, सिग्नल तोडू नका, विनाकारण हॉर्न वाजवू नका आदी संदेश देणारे फलक त्यांनी आपल्या दुचाकीला लावले आहेत.

Related Articles