ग्राहक पंचायतच्या कराड शाखेचा पनियुक्ती समारंभ उत्साहात
नवनिर्वाचित शहराध्यक्ष नीतीन शहा यांचा रुग्णमित्र चळवळ उभारण्याचा निर्धार

कराड/प्रतिनिधी : –
ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य शाखा, कराडचा पनियुक्ती समारंभ नुकताच संपन्न झाला. शहरातील बाबुभाई पदमसी हॉल येथे आयोजित समारंभात ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याच्या कोशाध्यक्षा सुनिताराजे घाटगे आणि कराड तालुकाध्यक्ष अधिकराव पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
यामध्ये कराड शहराध्यक्ष म्हणून नितीन शहा यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला ग्राहक पंचायत सातारा जिल्हा सरचिटणीस नंदकुमार काटे आणि मोहनराव घनवट यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना सुनिताराजे घाटगे म्हणाल्या, ग्राहक हक्कांचे संरक्षण करणे आणि ग्राहकांना त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सक्षम करणे हे ग्राहक पंचायतचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यामध्ये निष्ठा आणि प्रामाणिकपणा ठेवत ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन केले.
कराड तालुकाध्यक्ष अधिकराव पाटील यांनी मनोगतात तालुका स्तरावर ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी नवीन योजना आणि उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष नीतीन शहा यांनी ग्राहक पंचायतचे कामकाज वाढवण्यासोबतच कराड शहरात रुग्णमित्र चळवळ उभारण्याचा मनोदय व्यक्त केला. शहरातील रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी ही चळवळ उपयुक्त ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त करत ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी नवीन योजना आणि उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पनियुक्ती सोहळ्यात विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी ग्राहक पंचायतच्या माध्यमातून समाजासाठी सक्रियपणे योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. स्वागत सहसचिव डॉ. धनंजय खैर, हिरालाल खंडेलवाल यांनी आभार व्यक्त केले.