सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
कॉटेज हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचा आराखडा तयार करा – आ.डॉ. अतुलबाबा भोसले
56 2 minutes read

कराड/प्रतिनिधी : –
येथील कॉटेज हॉस्पिटलला (वेणुताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालय) उर्जितावस्था मिळण्यासाठी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून हॉस्पिटलच्या नूतनीकरणासंदर्भात सखोल आराखडा तयार करण्याच्या सूचना आपण त्यांना दिले आहेत. लवकरच हा आराखडा राज्य सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.
आ.डॉ. अतुल भोसले यांनी शुक्रवारी दुपारी येथील वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. तसेच येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णालयातील विविध सुविधा व कामकाजाचा आढावा घेतला. त्याचबरोबर रुग्णालयाच्या नूतनीकरणासंदर्भात एक सखोल आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीता लाळे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता लाळे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी, तसेच प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक राजेंद्र माने आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आ. डॉ. भोसले म्हणाले, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने तालुका व जिल्हा स्तरावर कृष्णा विश्व विद्यापीठाने काही तज्ञ डॉक्टर्स व वैद्यकीय शिक्षण घेणारे पदव्युत्तर विद्यार्थी पुरवण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आपण कृष्णाच्या माध्यमातून २० पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी उपजिल्हा रुग्णालयाला देणार आहोत. तसेच आपण एक पाऊल पुढे जात यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून कराडच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक त्या सर्व विभागांना तज्ञ डॉक्टर्स पुरवणार असल्याचे सांगितले आहे. सेवाभावी वृत्तीने आपण ही सेवा देणार असून त्यासाठी शासनाला कोणतेही वेतन किंवा मानधन द्यावे लागणार नाही. ते सरकार व लोकांची विनामूल्य सेवा करतील. यासंदर्भात एक सामंजस्य करार करण्याची विनंती आपण आरोग्यमंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयाला उर्जितावस्था मिळण्यासाठी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून हॉस्पिटलच्या नूतनीकरणासंदर्भात सखोल आराखडा तयार करण्याच्या सूचना आपण त्यांना दिले आहेत. लवकरच हा आराखडा राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.
तसेच याठिकाणी 100 बेडच्या हॉस्पिटलमध्ये आधुनिक ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न आहेत. पुणे-बंगलुरु महामार्ग लगत असलेल्या कराड शहरात आधुनिक ट्रामा केअर सेंटर असणे गरजेचे आहे. तशा प्रकारचा प्रस्ताव तयार करण्याच्याही सूचना आपण प्रशासनात दिल्या असल्याचे आ.डॉ. भोसले यांनी सांगितले.
त्याचबरोबर माता-बालक आरोग्य योजनेच्या माध्यमातून १०० बीडची नवीन इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. काही कारणास्तव याचे बांधकाम धीम्या गतीने सुरू असून अपूर्ण काम पूर्ण करण्यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच येथील स्वच्छता व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डीपीडीसीच्या माध्यमातून एक कोटी २१ लाखांचा लाखांची कामे करण्यात येणार आहेत. या संदर्भात नियोजन अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसंदर्भात आपण विधानसभेत आरोग्यमंत्र्यांच्या समोर आपले मत मांडले आहे. त्यादृष्टीने रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे एका प्रश्नावर बोलताना सांगितले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे
येथील वैद्यकीय व्यवस्था सुधारण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येणार आहेत. परंतु, आरोग्य विभागाच्या शासकीय पदावर बसलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही जबाबदारीने काम केले पाहिजे, असेही आ.डॉ. भोसले यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.
56 2 minutes read