सातारा जिल्हाहोम

कराडनगरीची ग्रामदेवता श्री कृष्णाबाईची यात्रा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

कराडनगरीची ग्रामदेवता श्री कृष्णामाईची चैत्री यात्रा आज बुधवार (दि. १६) उत्साहात संपन्न झाली. यात्रेनिमित्त मंदिर परिसर विद्युत रोषणाई व फुलांनी सजवला होता. तर सुवर्ण अलंकार आणि भरजरी साडीतील कृष्णामाईचे देखणे रूप डोळ्यात साठवत भक्तगण नतमस्तक होत होते. यात्रेनिमित्त कराड शहरासह ठिकठिकाणांहून आलेल्या भाविकांनी अवघा कृष्णाघाट परिसर फुलून गेला होता.

कृष्णामाईच्या सहा दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवाचा आज बुधवारी मुख्य दिवस होता. या महोत्सवात प्रथेप्रमाणे नित्याने पूजाअर्चा, विधी व धार्मिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न झाले. कृष्णामाईचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून लोकांच्या रांगा लागल्या होत्या. सालाबादप्रमाणे पुरणपोळ्यांचा नेवैद्य दाखवत व श्रीफळ वाढवत हजारो भक्तगणांनी कृष्णामाईचे मंगलमय वातावरणात दर्शन घेतले. दरम्यान, प्रसाद, मिठाईसह खेळणी विक्रीची दालने, खाद्य पदार्थांचे हातगाडे गर्दीने फुलून गेले होते.

हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर शनिवार (दि. १२) रोजी सायंकाळी श्री. आवटे पुजारी यांच्या निवासस्थानातून ‘श्रीं’ची सवाद्य पालखी मिरवणूक कृष्णा घाटावरील मंडपापर्यंत काढून तेथे भक्तिभावाने ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. रविवारी (दि. १३) रोजी मंगलप्रभात समयी ‘नवचंडी याग’ संपन्न झाला. दुपारी भजन, सायंकाळी बहारदार गाण्याचा कार्यक्रम पार पडला. मंगळवारी सायंकाळी हळदीकुंकू कार्यक्रमासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

बुधवारी (दि. १६) यात्रेचा मुख्य दिवशी दुपारी भजन झाले. दिवसभर यात्रेनिमित्त कृष्णामाईच्या दर्शनासाठी भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी यात्रेकरू, भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी यात्रा उत्सव कमिटीने योग्य नियोजन केले होते. यात्रेदरम्यान, दररोज महाप्रसाद वाटप करण्यात आला. तर यात्रेच्या मुख्य दिवशी कृष्णा घाटावरील मंडपात बुंदी वाटप करण्यात आले.

आज कृष्णामाईच्या पालखी नगरप्रदक्षिणेने होणार महोत्सवाची सांगता

आज गुरुवारी (दि. १७) सकाळी ढोल ताशांच्या गजरात कृष्णामाईची पालखीतून नगरप्रदक्षिणा होणार आहे. ही मिरवणूक मंडपात आल्यानंतर सायंकाळी लळीत कीर्तन, वसंतपूजा व रात्री येसूबाईच्या यात्रेने कराडकरांची कृष्णामाई यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे.

Related Articles