सातारा जिल्हाहोम

आमदारांना निवडणुकीपूर्वी ही बुद्धी का सुचली नाही? – निवास थोरात

सह्याद्रि’बाबत मनोज घोरपडे यांच्याकडून दिशाभूल

कराड/प्रतिनिधी : –

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालानंतर विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्याकडून आमच्या पॅनेलवर नाहक आरोप होत आहेत. त्या खोट्या आरोपांना उत्तर देणे आवश्यक आहे. आमदार ‘सह्याद्रि’च्या निवडणुकीनंतर आम्हाला नऊ जागा देत होतो, असे माध्यमांसमोर खोटे सांगत असून प्रत्यक्षात मात्र ते दोन-तीन जागाच द्यायला तयार होते. निवडणुकीपूर्वी त्यांना ही बुद्धी सुचली असती, तर नक्कीच ही वेळ आली नसती. त्यातून स्वाभिमानी सभासदांच्या मनातील आणि सर्वसामान्य सभासद कारखान्याचा अध्यक्ष झाला असता, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निवास थोरात यांनी केले.

नडशी (ता. कराड) येथे आमदार मनोज घोरपडे यांच्याकडून होत असलेल्या खोट्या आरोपांचा समाचार घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भरत चव्हाण, प्रकाश चव्हाण, आनंदराव थोरात, सर्जेराव थोरात, नानासाहेब थोरात उपस्थित होते.

श्री. थोरात म्हणाले, सह्याद्रि कारखान्याची निवडणूक झाली. सहकारातील निवडणूक समविचारी सहकारी एकत्र लढवतात. त्याप्रमाणे आम्ही ही निवडणूक लढली. यात आमच्या पॅनेलचा पराभव झाला. सभासदांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. अखेरच्या क्षणी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे माझी उमेदवारी बाद झाली. ऐनवेळी उमेदवारी बाद झाल्याने त्याचा परिणाम आमच्या मताधिक्यावर झाला. मुळात ही निवडणूक लढण्याची गरजच का पडली? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देणे आवश्यक आहे. म्हणूनच या माध्यमातून सभासदांपर्यंत भूमिका पोहोचवत आहे.

माजी आमदारांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना ताकदीने व एकजुटीने निवडून दिले. त्यानंतर होत असलेल्या ‘सह्याद्रि’च्या निवडणुकीत विद्यमान आमदारांनी आम्हाला साथ देणे अपेक्षित होते. पण त्यांनी आमच्यावरच खोटे आरोप केले, ते मनाला पटणारे नाहीत. निकाल काय असेल? याची तमा न बाळगता ‘सह्याद्रि’च्या निवडणुकीत धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, संपतराव माने, भीमराव पाटील असे समविचारी कार्यकर्ते एकत्र आलो. ‘सह्याद्रि’च्या निवडणुकीच्या लढाईची सुरुवात २२२१ सभासदांना मतदानाचा हक्क मिळविण्यापासून खऱ्या अर्थान मी सुरू केली होती. आमदारांनी ‘सह्याद्रि’च्या निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य नसेल, अशी घोषणा केली होती. त्यामुळे आमच्यात सकारात्मक वातावरण तयार झाले होते. पण सत्तेची लालसा शांत बसू देत नाही, हे या निवडणुकीत दिसून आले. ‘सह्याद्रि’ आणि सभासदांना यावेळी परिवर्तनाची अपेक्षा होती. असे असतानाही आमदारांनी परस्परच तिसऱ्या पॅनेलची तयारी सुरू केली. आमदारांनी सभासदांच्या हितासाठी नूतन संचालक मंडळाने पारदर्शक कारभार करावा, यासाठी प्रयत्न करायचे सोडून आमच्या पॅनेलवर आरोपांची मालिका सुरू केली असल्याचे आश्चर्य वाटते, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

Related Articles