सातारा जिल्हाहोम

कृष्णा सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय १२११ कोटी रुपये – आ. डॉ. अतुलबाबा भोसले

सलग ११ वर्षे एन.पी.ए. शून्य टक्के; सी.आर.ए.आर.चे प्रमाण १९.१७ टक्के

कराड/प्रतिनिधी : – 
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १२११ कोटी ७४ लाख रुपयांचा एकूण व्यवसाय करत, १८ कोटी ९९ लाखांचा ढोबळ नफा प्राप्त केला आहे. तसेच बँकेने सलग ११ व्या वर्षी निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के राखण्यात यश मिळविले आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे बँकेच्या भांडवल पर्याप्तता निधी (सी.आर.ए.आर.) चे प्रमाण १२ टक्के आवश्यक असते; ते १९.१७ टक्के इतके आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची माहिती, चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून, लोकांना बचतीची सवय लागावी व गरजेनुसार कर्ज घेता यावे, यासाठी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांनी कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा बँकेने गेली ५४ वर्षे अव्याहतपणे सेवा देत, सर्वसामान्यांचे हित जपले आहे.
बँकेच्या ३१ मार्च २०२५ अखेरच्या एकूण ठेवी ७५४ कोटी १३ लाख रूपयांच्या असून, ४५७ कोटी ६१ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय १२११ कोटी ७४ लाख रुपये झाला असून, बँकेच्या भांडवल पर्याप्तता निधी (सी.आर.ए.आर.) चे प्रमाण १९.१७ टक्के आहे. बँकेचे एकूण भागभांडवल १० कोटी १३ लाख आहे; तर १०२ कोटी ९३ लाखांचा स्वनिधी आहे. तसेच बँकेला १८ कोटी ९९ लाखांचा ढोबळ नफा, तर ११ कोटी ६५ लाख रुपये निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. बँकेने सलग ११ व्या वर्षी निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के राखण्यात यश मिळविले असून, ग्रॉस एन.पी.ए. ३.३५ टक्के आहे. तसेच बँकेने एकूण उत्पन्नावर ३ कोटी ९६ लाख रुपये इन्कम टॅक्स भरलेला आहे.
बँकेने ग्राहकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक मोबाईल बँकींग, यूपीआय सेवेच्या माध्यमातून गुगल पे, फोन पे द्वारे सेवा, एटीएम सुविधा, ई-कॉमर्स, आर.टी.जी.एस. / एन.ई.एफ.टी., एन.ए.सी.एच्. यासारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू केल्या आहेत. कृष्णा बँक सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या ४ जिल्ह्यात २२ शाखा व १ विस्तारीत कक्षाच्या माध्यमातून ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा देत आहे. बँकेच्या ठेव व कर्जयोजनांचा तसेच अन्य सुविधांचा लाभ लोकांनी घ्यावा, असे आवाहन चेअरमन आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले आहे.

Related Articles