सातारा जिल्हाहोम

राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मिळणार आता कराटे प्रशिक्षणाचा लाभ – श्रीरंग काटेकर 

तीन महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी राज्य सरकारचा निर्णय

सातारा/प्रतिनिधी : –
राज्यातील महिला विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे छेडछाडीचे वाढते प्रमाण पाहता राज्य सरकारने राज्यभरातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील सर्व महाविद्यालयीन प्रशासनाला याबाबत सतर्क करण्यात आले असून महाविद्यालय स्तरावर तीन महिन्याचा स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात यावे, असे परिपत्रक राज्य सरकारने प्रसिद्ध केले असल्याची माहिती गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब (सातारा) चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी दिली.
ते म्हणाले, विद्यार्थिनींमध्ये शारीरिक व मानसिक मनोबल उंचावणे त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीत निर्भयपणे येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी तीन महिन्याचा कराटे प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात राज्य सरकारने चालना दिले आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात असून विद्यार्थिनींना या प्रशिक्षणातून स्वसंरक्षणाचे धडे त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे मुलींवर होणारे अन्याय, अत्याचार यास आळा बसण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर या प्रशिक्षणात योगसाधना व मेडिटेशन याचाही विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असे उपक्रम भविष्यकाळासाठी उपयुक्त ठरणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थिनींना एक ऊर्जा मिळाली आहे. या उपक्रमाचा तपशील महाविद्यालय प्रशासनाने शासनाला कळवणे बंधनकारक केले आहे…
स्पर्धेच्या युगात स्वसंरक्षण काळाची गरज
विशेषतः महिला व विद्यार्थिनींना सर्व क्षेत्रात कार्यरत असलेने त्यांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. महिला सशक्तिकरण धोरणाला अनुसरून राज्य सरकारने महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थिनींना तीन महिन्याचे कराटे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा विद्यार्थिनींना भविष्यातील वाटचालीसाठी लाभ होणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय स्तुत्य असून विद्यार्थिनींमध्ये  नवा आत्मविश्वास उंचवण्यासाठी कामी येणार आहे.

Related Articles