सातारा जिल्हाहोम

सभासदांकडून माफीनामा घेतलेल्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार – आ. मनोजदादा घोरपडे 

शिरवडे येथे सभासद बैठक उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाने शेतकऱ्यांनी अन्यत्र ऊस घातला म्हणून त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला. मालकांकडून विश्वस्तांनी माफीनामा लिहून घेण्याचे हे एकमेव उदाहरण असेल. त्यामुळे सभासद यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे प्रतिपादन आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केले.

तसेच सह्याद्रि कारखान्याची निवडणूक दुरंगी होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पंरतु, काहींची भूमिका वेगळी होती. आजवर तिरंगी लढतीचा फायदा त्यांना ते आमदार असल्यामुळे झाला. आता मी आमदार आहे. त्यामुळे तिरंगीचा फायदा आम्हाला होणार असल्याचा विश्वासही आमदार घोरपडे यांनी व्यक्त केला. तसेच सताधाऱ्यांना मदत होईल, अशी भूमिका घेणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

शिरवडे (ता. कराड) येथे ते कारखाना पंचवार्षिक निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित प्रचार बैठकीत ते बोलत होते. यावेळी पै. संतोष वेताळ, राजेंद्र पाटील, सर्जेराव थोरात, दिनकर पाटील, राजेंद्र जगदाळे, कृष्णत थोरात, अनिलराव डुबल, पै. नयन निकम, भावड्या बोराटे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार घोरपडे म्हणाले, विधानसभेत पराभव झाल्यानेच सभासदांना साखर फुकट देण्याचा निर्णय झाला. कामगारांना अमिषे दाखवली. पंरतु, हे निवडणुकीचे गाजर आहे. कारखान्यातील परिपूर्णता आम्हीच करणार असून पात्र कामगारांना शंभर टक्के परमनंट करणार आहे. कामगारांचे हित जपण्यासाठी काम केले जाईल. आज कारखान्याच्या खोल्यांचे भाडे खाल्ले जाते, कार्यक्रमात लावलेल्या मंडपातही कमिशन खाल्ले जाते. हा चिंधीचोरीचा प्रकार असल्याचा आरोप आमदार घोरपडे यांनी केला.

सह्याद्रि कारखान्याच्या सभासदांकडून माफीनामा लिहून घेतला हा अधिकार त्यांना दिला कुणी? मी कारखान्याचा मालक व सगळेजण माझे गुलाम आहेत, अशा आविर्भावात ते आहेत. आज कारखान्याचे एक्सपांन्शन होत असताना चुकीच्या कंपनीला ऑर्डर दिल्याने तीन वर्षांपासून हे काम रेंगाळले. कारखान्याची निवडणूक लागल्यामुळे एक्सपांन्शनचे काम पूर्ण झाले असल्याचे दाखवण्याच्या घाईगडबडीत कारखान्याचा ईएसपी बॉयलर फुटला. पूर्वी कारखान्यात वादळ झाले, त्यात यांची आमदारकी गेली. आता ईएसपी बॉयलर फुटला, यामध्ये कारखान्याची सत्ता जाणार, असा टोला आमदार घोरपडे यांनी लगावला.

तसेच आजवर सभासदांच्या हिताचा कुठलाही निर्णय कारखान्यातून झाला नाही. जाणिवपूर्वक वारस नोंदी टाळणे, माफीनामे लिहून घेत भीती दाखवणे, असे एक ना अनेक प्रकार झाले. नोंदींच्या बाबतीत पारदर्शकता नसल्याने सभासदांच्या उसाला वेळेवर तोड मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात स्व. यशवंत चव्हाण साहेब सहयाद्री परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून कारखान्याला उर्जितावस्था प्राप्त करुन देणारच असल्याचे आमदार घोरपडे यांनी सांगितले.

विकासकामांसाठी 7.50 कोटींचा निधी मंजूर

अवघ्या साडेतीन महिन्यात कराड उत्तरमधील विकासकामांना गती देण्यात यश आले असून कराड उत्तरमधील अनेक गावांतील अंतर्गत विकासकामांसाठी 7.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उर्वरित गावांना येणाऱ्या काळामध्ये निधी उपलब्ध करण्यात येईल, असे आश्वासन आमदार घोरपडे यांनी दिले.

Related Articles