कराड तालुक्यातील शालेय पोषण आहार लेखापरीक्षण पूर्ण

कराड/प्रतिनिधी : –
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कराड तालुक्यातील शालेय पोषण आहार सुरू असलेल्या सर्व शाळांचे लेखापरीक्षण करण्यात आले. मे.शिंदे, चव्हाण, गांधी अँड कंपनी – पुणे या कंपनीच्या अधिकाऱ्यांमार्फत लेखापरीक्षण करण्यात आले. या लेखापरीक्षणामध्ये सन 2020 -21 ते सन 2023 -24 या चार वर्षातील आर्थिक व्यवहारांचे परीक्षण करण्यात आले.
कराड तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक अशा सर्व शाळांनी या लेखापरीक्षणामध्ये सहभाग घेतला होता. या लेखा परीक्षणामध्ये बँक पासबुक, कीर्द, खतावणी, तांदूळ खर्च विवरण नोंदवही, शासन खाती भरण्यात आलेल्या रकमांचे चलन, व्हाउचर फाइल्स, उपयोगिता प्रमाणपत्र आदी बाबींची कसून तपासणी करण्यात आली. या लेखापरीक्षणामध्ये काही त्रुटी आढळल्यास सदर शाळांना याबाबत मार्गदर्शन करून या त्रुटी सोडवून घेण्यात आल्या आणि सर्व शाळांचे 100 टक्के लेखापरीक्षण पूर्ण करण्यात आले.
हे लेखापरीक्षण पूर्ण करण्यासाठी ऑडिटर्स म्हणून समाधान ननावरे, सुरज भोसले, स्वप्निल भोरे, स्वप्नील शिंदे, शुभम हाके, ओंकार उपे, आकाश भुरे यांनी काम पाहिले. यावेळी कराड पंचायत समितीचे शालेय पोषण आहार अधीक्षक विजय परीट आणि कराड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांची उपस्थिती होती. सर्व शाळांनी ऑडिट पूर्ण केल्याने कराड तालुका शालेय पोषण आहार आर्थिक लेखापरीक्षण 100 टक्के पूर्ण झाले आहे.