आयुष्यमान स्पेशलहोम

कै. पद्मराज बापूराव वेळापुरे (गुरुजी)

माझे वडील पद्मराज बापूराव वेळापुरे प्राथमिक शिक्षक. नोकरी पाच ते सहा घराचे गाव असणारे कोकणातील पोस्टाची वाडी येथे मुले गोळा करून व साठ रुपये मासिक पगारावर सुरुवात केली. पुढे कोलाड, महाड, महाबळेश्वर, नांदलापुर व कराड असा शिक्षकी पेशाचा प्रवास करीत मुख्याध्यापक पदावर सन 1991 ला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर मूळ गाव रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे शेती व्यवसाय व पेन्शनर म्हणून कार्यरत राहिले. त्यादरम्यानही जनगणना अधिकारी, विद्यार्थी संस्कारासाठी कब बुलबुल पथकाचे संचालक, विविध शिक्षक अधिवेशनाचे अधिकारी म्हणून कार्यरत राहिले.

मी विवेक त्यांचा मोठा मुलगा श्री कालिकादेवी नागरी पतसंस्था मर्यादित, कराड येथे मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. मुलगी शुभांगी सध्या रा. नाशिक येथे व तर लहान मुलगा सचिन सिंहगड इन्स्टिट्यूट, पुणे येथे प्राध्यापक पदावर कार्य करीत आहेत. गुरुजींनी समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून विविध जातीतील समाजात वधु-वर मेळावे यात भाग घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमंती करीत जवळजवळ 100 विवाह जुळवून ते पार पाडले आहेत. त्यांच्या कार्याचा ठसा संपूर्ण कराड शहर व परिसर, विविध शिक्षण संस्था यांच्याशी निगडित आहे. शिक्षक पेशाची नोकरी, विविध व्यवसाय, शेती हे सांभाळून देखील आध्यात्मिक प्रवासात

ते

निबरर्गी संप्रदायाचे परम गुरु श्री गुरुदेव रानडे यांचे शिष्य होते व त्यांनी दिलेल्या नामस्मरणाने आध्यात्मिक उन्नती साधत होते. त्यांची आरती व नामस्मरणाशिवाय त्यांचा एकही दिवस जात नसे. शेवटच्या श्वासातही गुरुने दिलेले नाम प्रत्यक्ष व्हेंटिलेटरवर सुद्धा ऐकू आले. एवढे विविध कार्य करीत असतानाही आरोग्याच्या सर्व समस्यांवर मात करीत पक्षाघात, शुगर, करोनातून ते सहीसलामत बाहेर पडले व कोव्हिड योद्धाही ठरले. ते 92 वर्षांपर्यंत सर्वांना मार्गदर्शन करीत राहिले. त्यांचा जीवनप्रवास आपणा सर्वांसाठी एक आदर्श असा राहिलेला आहे.

त्यांना परमशांती लाभो,

ही ईश्वर चरणी प्रार्थना…

– विवेक पद्मराज वेळापूरे

– सचिन पद्मराज वेळापूरे

Related Articles