आयुष्यमान स्पेशल

डीपी जैन कंपनीच्या कामगारांचे काम बंद आंदोलन

७०० कामगारांचा सहभाग; एक महिनाआड पगार, तर नऊ महिन्यांच्या पीएफची रक्कमही गायब

कराड/प्रतिनिधी : –

पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणांतर्गत कराड शहरालागत उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. डीपी जैन या ठेकेदार कंपनीकडे असलेले हे काम सध्या पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. परंतु, या कंपनीकडून गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या कामगारांना एक महिनाआड पगार दिला जात असून नऊ महिन्यांच्या पीएफची रक्कमही कामगारांच्या खात्यावर जमा केलेली नाही. त्यामुळे संतप्त कामगारांनी सोमवारी कंपनीविरोधात काम बंद आंदोलन पुकारले आहे.

रस्ते, महामार्ग आणि उड्डाणपुल निर्माण करणारी डीपी जैन ही कंपनी भारतातील नामांकित कंपनी आहे. त्यामुळे पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा ठेका सरकारतर्फे या कंपनीला देण्यात आला. त्यानुसार गेल्या वर्ष, दीड वर्षांपासून पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणांचे काम सुरु आहे. त्यांतर्गत कराड शहरालागत सहापदरी उड्डाणपुल उभारानिचेही काम सुरु असून त्याचे जवळपास ८० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. या  महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी कंपनीचे इंजिनीअर, ड्रायव्हर, ऑपरेटर व अन्य  कामगार कार्यरत आहेत. मात्र, कंपनीकडून हातावर पोट असलेल्या कामगारांची पिचावणूक केली जात असल्याने अनेकदा समोर आले आहे. गत वर्षभरात कामगारांनी तिसऱ्यांदा काम बंद आंदोलन केल्याने ते अधोरेखीर होते.

सोमवारी (दि. १३) रोजी सकाळी कराड उड्डाणपूल, कोयना नदीवर उभारण्यात येणार पूल आणि धोंडेवाडी (ता. कराड) येथील कंपनीच्या कास्टिंग यार्डवरील कामगारांनी प्रलंबित पगार आणि नऊ महिन्यांची पीएफची रक्कम मिळण्यासाठी काम बंद आंदोलन पुराकारे. यामध्ये जवळपास ७०० कामगार सहभागी झाले होते. कामगारांच्या आंदोलनाची ठेकेदार कंपनीकडून कशा प्रकारे दखल घेण्यात येईल? त्यांच्या मागण्या पूर्ण होणार की नाही? कंपनी कोनाथ ठोस निर्णय घेणार? याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, डीपी जैन कंपनीकडून कामगारांचे गेल्या काही महिन्यांपासून एक महिनाआड, तर कधीकधी तीन महिन्यांतून एकदा पगार दिला जात आहे. तसेच कामगारांच्या पगारातून पीएफची रक्कम कट केली जाते. मात्र, तितकीच रक्कम कंपनीकडून कामगारांच्या खात्यावर वर्ग होणे आवश्यक आहे. परंतु, गेल्या नऊ महिन्यांच्या कंपनीकडून पीएफची रक्कम कामगारांच्या खात्यावर जमा झालेली नाही.

तीन कोटींचा पीएफ कंपनीने गोठवला 

डीपी जैन कंपनीने कामगारांना नऊ महिन्यांच्या पीएफ दिलेला नाही. याची जवळपास तीन कोटी रुपये रक्कम होत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. तसेच कामगारांच्या हक्काचे पैसे इतरत्र वापरून त्यावर नफा कमावण्याचा कंपनीचा उद्देश असल्याचीही चर्चा कामगारांमध्ये सुरु आहे.

कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत

डीपी जैन कंपनीकडे असलेल्या महामार्ग विस्तारीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. तसेच नांदलापूर ते कराड अशा साडेतीन किलोमीटरच्या ब्रिजचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर कोयना ब्रिजचे कामही प्रगतीपथावर आहे. त्यामुळे कंपनीने आपले काही साहित्य हलवण्यास सुरुवात केली असून लवकरच कंपनी आपला गोशा गुंडाळणार असल्याचे चित्र असल्याने कामगारांना आपल्या पगाराची आणि आपल्या हक्काच्या पीएफची रक्कम मिळणार की नाही? अशी चिंता अनेक कामगारांनी बोलून दाखवली.

Related Articles