सातारा जिल्हाहोम

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

कराड/प्रतिनिधी : –

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी प्रीतिसंगमावरील स्व. चव्हाण साहेबांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी नेहमीच लोकांच्या कल्याणाला प्राधान्य दिले. त्यांनी राज्याच्या औद्योगिकीकरणाला, रोजगार निर्मितीला चालना दिली. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न कराड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले नक्कीच करतील. कराड दक्षिण मतदारसंघातील जनतेने, विशेषतः तरुण पिढीने आणि महिलांनी डॉ. अतुलबाबांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. येत्या काळात ते स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी काम करतील.

यावेळी माजी नगरसेविका स्मिता हुलवान, विजय वाटेगावकर, आप्पा माने, सौ. विद्या पावसकर, भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. स्वाती पिसाळ, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, रमेश लवटे, विष्णू पावसकर, गिरीश शहा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार कराड दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश पाटील  – वाठारकर यांच्या निवासस्थानी डॉ. सुरेश भोसले यांनी ना. पवार यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. ऋतुजा पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Related Articles