मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही एकत्रीत चर्चेअंती निर्णय घेऊ – अजित पवार

कराड/प्रतिनिधी : –
मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी बसून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ. मुख्यमंत्रीपदावर सरकारचा कोणताच फॉर्म्युला अजून तरी ठरलेला नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माझी नेता म्हणून निवड झाली असून सर्व अधिकार मला दिले आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचा नेता म्हणून निवड झाली आहे. आता भाजपने नेते निवड कुणाची करायची ते ठरवतील. आम्ही तिघंही नंतर एकत्र बसू. आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू. राज्याला मजबूत, स्थिर सरकार देऊ, असे मत उपुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 40 व्या स्मृतिदिनानिमित्त कराड येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आ. हसन मुश्रीफ, आ. मकरंद पाटील उपस्थित होते.
ते म्हणाले, आम्हाला बहुमत मिळाले म्हणून विरोधकांनी ईव्हीएमवर खापर पडू नये. छत्तीसगडमध्ये निवडून आल्यावर तिथे ईव्हीएम घोटाळा झाला नाही? लोकसभेला आमच्या झालेल्या पराभवावेळी ईव्हीएम घोटाळा झाला नाही? असे सांगत ते म्हणाले, लोकसभेच्या पराभवातून धडा घेत आम्ही काम केले. जनतेपर्यंत अनेक योजना पोहोचवल्या. त्यामुळे महायुतीला हे यश मिळाले आहे.
बारामतीतील लढतीबाबत ते म्हणाले, युगेंद्र हा व्यावसायिक असून त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. लोकसभेला माझी चूक झाली, हे मी सर्वांना सांगून दमलो. तरीही माझ्या सख्ख्या पुतण्याला माझ्या विरोधात उभं करायचं काहीच कारण नव्हतं. माझी चूक झाली, म्हणजे घरातलाच माणूस उभा करायचा काय? असेही ते म्हणाले.
दरम्यान, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी समाधीस्थळी अभिवादन केले. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी काका अजितदादा आणि पुतण्या रोहित पवार हे आमने-सामने आले. यावेळी रोहित पवार यांनी काका अजितदादा यांची भेट घेत वाकून नमस्कार केला. यावेळी अजितदादांनी रोहित पवार यांच्या हातात हात देत ‘दर्शन घे काकाचं, रोहित तू थोडक्यात वाचलास. माझी सभा झाली असती तर तुझं काही खरं नव्हतं,’ असा मिश्किल टोलाही लगावला.