कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे यांचा करिष्मा
माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा धक्कादायक पराभव

कराड/प्रतिनिधी –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आज इतिहास घडला. राष्ट्रवादीचे उमेदवार माजी सहकारमंत्री, विद्यमान आ. बाळासाहेब पाटील यांचा भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी दारूण पराभव केला. मनोज घोरपडे यांना 1 लाख 34 हजार 626 मते मिळाली. तर विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांना 90 हजार 935 मते मिळाली. या ठिकाणी मनोज घोरपडे यांचा 43 हजार 691 मतांनी मोठा विजयी झाला.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात झाली. याठिकाणी पहिल्या फेरीत मनोज घोरपडे यांनी विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्या 2884 मतांची लीड घेतले. त्यानंतर हे लीड आमदार बाळासाहेब पाटील यांना अपवाद वगळता शेवटपर्यंत तोडता आले नाही. पहिल्या सातव्या – आठव्या फेऱ्यांमध्येच मनोज घोरपडे यांनी तब्बल 18 हजार पेक्षा जास्त मतांचे निर्णायक लीड घेतल्याने घोरपडे समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषास सुरुवात केली.
निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी मनोज घोरपडे यांना विजय घोषित केले. या ठिकाणी मनोज घोरपडे यांना एक1 लाख 34 हजार 626 मते मिळाली. तर बाळासाहेब पाटील यांना 90935 मते मिळाली. याठिकाणी मनोज घोरपडे यांचा 43 हजार 691 मतांनी विजय झाला. यानंतर मनोज घोरपडे यांनी कराड येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून मनोज घोरपडे यांनी आघाडी घेतली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीतच मनोज घोरपडे यांना २ हजार ८८४ एवढे मताधिक्क्य मिळाले. त्यानंतर दुसऱ्या फेरीत ५ हजार ७१९, तिसऱ्या फेरीत ७ हजार ३४४, चौथ्या फेरीत ११ हजार ७१०, पाचव्या फेरीत १३ हजार ३३०, सहाव्या फेरीमध्ये १५ हजार ७१५, सातव्या फेरीत १९ हजार १७३, आठव्या फेरीत २१ हजार ५४७, नवव्या फेरीत २३ हजार ३९६ तर दहाव्या फेरीत मनोज घोरपडे यांनी मताधिक्क्याचा २५ हजाराचा आकडा ओलांडला. दहाव्या फेरीपुर्वीच घोरपडेंचा विजय निश्चित झालेला. त्यापुढे केवळ मतांची आघाडी किती, याची उत्सुकता समर्थकांसह कार्यकर्त्यांना लागून राहिली होती. अकराव्या, बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या फेरीत त्यांनी अनुक्रमे २६ हजार ५७७, २९ हजार १७७, २९ हजार ६१२ आणि ३१ हजार ६६६ एवढे मताधिक्क्य मिळवले. त्यानंतरच्या पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस आणि वीस या फेऱ्यामध्ये त्यांच्या मताधिक्क्याचा आकडा वाढतच गेला. विसाच्या फेरीअखेर त्यांना ३९ हजार २०९ मतांची आघाडी घेत चाळीस हजाराच्या मताधिक्क्याकडे मुसंडी मारली. अखेरच्या सहा फेऱ्यांमध्ये त्यांनी हा आकडा ओलांडत पंचवीसाच्या फेरीअखेर तब्बल ४३ हजार ६९१ एवढे मताधिक्क्य मिळवून बाळासाहेब पाटील यांचा दारुण पराभव केला.
येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये आज सकाळी आठ वाजल्यापासून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी सुरू झाली. मनोज घोरपडे यांचे समर्थक व कार्यकर्ते सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी केंद्राबाहेर थांबून होते. पहिल्या फेरीपासून घोरपडेंना आघाडी मिळत असल्याचे दिसताच समर्थकांची गर्दी आणि या गर्दीचा आवाजही वाढत गेला. प्रत्येक फेरीतील मताधिक्क्याचा आकडा जाहिर होताच कार्यकर्त्यांच्या घोषणांचा आवाज चढत होता. मनोज घोरपडे यांच्या विजयाची खात्री होताच दहाव्या फेरीपासून केंद्राबाहेर फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण सुरू झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला.