कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रनिहाय निवडणूक पथके रवाना

कराड/प्रतिनिधी : – महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व 356 मतदार केंद्रांवरील नियुक्त कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रांवर रवाना झाले. नियोजित केंद्रावर जाण्यासाठी
57 एसटी बस, 2 मिनीबस व 9 जीपांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान कर्मचाऱ्यांना 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे, डॉ. जस्मिन शेख यांनी सूचना दिल्या.
साहित्य वितरणावेळी निवडणूक निरीक्षक गीता ए या उपस्थित होत्या. पथकांतील मतदान कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था टेबल निहाय करण्यात आल्याने पथकाचे तात्काळ गठन झाले. मतदान साहित्य वितरणाचे योग्य नियोजन केल्यामुळे नियोजित वेळेत साहित्य वितरण झाले. मतदान कर्मचाऱ्यांनी आणलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था बैल बाजाराच्या आवारात करण्यात आली होती. वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन केल्यामुळे वाहतुकीची कोठेही कोंडी झाली नाही.
साहित्य वितरणाचे काम नायब तहसीलदार उबारे, सहाय्यक महसूल अधिकारी युवराज काटे, प्रशांत कोळी,, तर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक सचिन बिटले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.