विकासकामांचा कोट्यवधीचा निधी गेला कुठे? : हर्षद कदम

कराड / प्रतिनिधी : –
पाटण मतदारसंघातील महत्त्वाचा भाग म्हणजे मोरणा विभाग. मात्र हा विभाग आजही मूलभूत विकासापासून दूर आहे. विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केल्याचे विरोधक डोंगारा पिटतात. मग विकासकामांचा कोट्यवधीचा निधी गेला कुठे? असा सवाल भानुप्रताप उर्फ हर्षद कदम यांनी केला.
पाटण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भानुप्रताप उर्फ हर्षद कदम यांच्या प्रचारार्थ गावभेट दौऱ्यात मोरणा विभागात त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
हर्षद कदम म्हणाले, पाटणला मंत्रीपद मिळून देखील मोरणा विभागात प्रभावशाली विकासकामे अजूनही अपूर्णच आहेत. गेल्या कित्येक वर्षांत या मतदारसंघाचा विकास पूर्णपणे रखडलेला आहे.
विद्यमान आमदारांनी विकासकामांचे नारळ फोडले. परंतु प्रत्यक्षात नक्की कुणाचा विकास झाला, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. विकासकामांसाठी मिळालेला कोट्यवधी निधीचा आकडा बोर्डवरच दिसतो. प्रत्यक्षात सर्व कामे अपूर्ण असल्याची खंत हर्षद कदम यांनी व्यक्त केली.
रस्त्यांची झालेली दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा, कचऱ्याची समस्या, तुंबणाऱ्या गटारी अशी दयनीय अवस्था मतदार संघाची झाली आहे. अशा मूलभूत सोयी सुविधांकडे. नेते म्हणवणाऱ्याचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांनी जनतेला बरीच ओश्वासने दिली. अशा प्रकारे जनतेची दिशाभूल आता होणार नाही, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.